लसीकरणाची पहिली मात्रा घेणाऱ्यांसाठी ‘कोव्हिशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा नसल्याने पुणे आणि ठाण्यात कोव्हॅक्सिनचा वापर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याने सोमवारी गोंधळ उडाला. पुण्यात खासगी रुग्णालयात कोव्हॅक्सिनची मात्रा द्यायची की कोव्हिशिल्डची? या संभ्रमामुळे ज्येष्ठांना मन:स्ताप झाला. तर ठाण्यात ‘कोव्हिशिल्ड’च्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीमेचा फेरआढावा घेण्यात आला.

ठाण्यात लसीकरणाचा आढावा

जिल्ह््यातील काही शहरांमध्ये ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या ‘कोव्हीशिल्ड’ लशीचा तुटवडा निर्माण झाल्याने प्रशासनाने सोमवारी लसीकरण मोहिमेचा फेरआढावा घेतला. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लस तुटवडा जाणवत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढू लागल्याने जिल्ह््यातील महापालिकांनी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ५३ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र, ‘कोव्हीशिल्ड’ लशीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने सोमवारी मोहिमेचा फेरआढावा घेतला. भाजपचे आमदार सजंय केळकर यांनीही याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ‘कोव्हीशिल्ड’चा साठा उपलब्ध नसल्याची माहिती दिली. तसेच हा साठा वेळेत उपलब्ध झाला नाहीतर लसीकरण मोहिमेवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली.

ठाणे शहर वगळता भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर महापालिका प्रशासनाने ‘कोव्हीशिल्ड’चा साठा मुबलक असल्याचा दावा केला आहे. तर, ‘कोव्हीशिल्ड’ लशीची पहिली मात्रा दिलेल्या व्यक्तींसाठी दुसऱ्या मात्रेचे नियोजन करण्यात आले असून तो साठा मुबलक असल्याचा दावा ठाणे महापालिका प्रशासनाने केला आहे. तरीही काही केंद्रांना पुरेशा प्रमाणात लशीचा साठा मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या.

कोव्हीशिल्ड ऐवजी कोव्हॅक्सिन

लशीचा पुरवठा एक दिवस उशिराने म्हणजेच शनिवारी झाल्याची कबुली ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. परंतु तुटवडा निर्माण झाल्यासारखी परिस्थिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर, पहिली मात्रा दिलेल्या व्यक्तींसाठी दुसरी मात्रा देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे, त्यासाठी लससाठा मुबलक असल्याचे ठाणे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले. राज्य सरकारकडून ‘कोव्हीशिल्ड’ऐवजी ‘कोव्हॅक्सिन’चा पुरवठा जास्त होत आहे. त्यामुळे ठाणे शहरात आता ‘कोव्हॅक्सिन’ लस दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ठाणे शहरात पहिली मात्रा ‘कोव्हीशिल्ड’ची घेतलेल्या व्यक्तींना दुसरी मात्रा देण्यासाठी नियोजनानुसार त्या लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. परंतु आता ‘कोव्हिशिल्ड’ उपलब्ध होत नसल्यामुळे नव्या व्यक्तींच्या लसीकरण्यासाठी ‘कोव्हॅक्सिन’चा वापर करावा लागणार आहे. या लशीचा मुबलक साठा पुरवण्यात आला आहे.

– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका

मुंबईत पुरेसा साठा…

मुंबई महापालिकेकडे  ‘कोव्हीशिल्ड’च्या सुमारे तीन लाख मात्रा आणि ‘कोव्हॅक्सिन’च्या सुमारे ६८ हजार मात्रा उपलब्ध आहेत. मुंबईत या दोन्ही लशींचा पुरेसा साठा आहे, तुटवडा नाही. शहरात खासगी आणि सरकारी अशा ७७ रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू असून शनिवारी जवळपास ४५ हजार लोकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.