लोकसत्ता प्रतिनिधी
उल्हासनगरः उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना पालिका प्रशासनाकडून त्यावर ठोस काही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. डांबर आणि कॉंक्रिट कमी वापरल्याने रस्ते खराब होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने पालिकेला डांबर आणि सिमेंट दान देण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण उल्हासनगर शहराच्या रस्त्याची अतिशय दूरावस्था आहे. वारंवार उल्हासनगर महानगरपालिका कोट्यवधी रुपय खर्च करून रस्ते दुरुस्त करते. पण ते रस्ते पुन्हा खराब होतात. ऐन गणेशोत्सवाच्या सणाच्या काळात शहरात खड्ड्यांचे साम्राज पसरले होते. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. गणेशोत्सवानंतरही शहरातील रस्त्यांची अवस्था बिकटच आहे. त्यामुळे येत्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीत तरी रस्त्यांची स्थिती चांगली असावी यासाठी पालिकेला आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा… ठाणे: अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकाला अटक
मात्र त्यावर ठोस उपापयोजना होत नसल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेकडून नेमलेल्या रस्त्यांचे कंत्राटदार रस्त्यांची दुरूस्ती करत असताना त्यामध्ये डांबर कमी वापरत असल्याने किंवा काँक्रिट रस्त्यामध्ये सिमेंट कमी वापरत असल्याने रस्त्यांना वारंवार खड्डे पडत असल्याचा आरोप उल्हासनगर काँग्रेसने केली आहे. रस्त्याच्या या दुरावस्थेवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कोणताही अंकुश नसल्याने कंत्राटदारही बिनधास्त झाले आहेत. त्यामुळे पालिकेला डांबर आणि सिमेंट दान करून रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी मदत करावी अशा आशयाचे पत्र उल्हासनगर काँग्रेसचे अध्यक्ष रोहित साळवे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. येत्या मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या वतीने डांबर आणि सिमेंट पालिकेला दान केले जाणार आहे. किमान हे दान घेऊन तरी पालिका प्रशासनाला लाज वाटावी आणि त्यांनी तात्काळ शहरातील रस्ते दुरुस्त करावे, अशी आम्हाला आशा असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. ज्या नागरिकांना या अभियानात सहकार्य करायचे असेल त्यांनी डांबर आणि सिमेंट दान उल्हासनगर काँग्रेस कार्यालय येथे जमा करावे असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.