महापालिकेतील एकहाती सत्ताही गमावली

जयेश सामंत, ठाणे</strong>

अतिशय पोषक वातावरण असतानाही स्वतच्या हाताने स्वतचा पराभव करून घेण्यात पटाईत मानल्या जाणाऱ्या भिवंडी काँग्रेस पक्षाला गुरुवारी झालेल्या महापौर निवडणुकीतही गाफील राहिल्याचा फटका सहन करावा लागला. राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे झालेले दुर्लक्ष, स्वमग्न स्थानिक नेते, चुकीच्या उमेदवाराची निवड, शिवसेनेची साथ असूनही भाजपच्या खेळींकडे कानाडोळा करण्याचा गाफीलपणा यामुळे भिवंडी महापालिकेत अडीच वर्षांपूर्वी नागरिकांनी दिलेली एकहाती सत्ताही गमावण्याची वेळ आता काँग्रेसवर आली आहे.

एक काळ असा होता, जेव्हा काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करू शकते असे म्हटले जायचे. गेल्या काही महिन्यांत भिवंडी परिसरात काँग्रेसने ही उक्ती पुरेपूर साध्य करून दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची बऱ्यापैकी हवा असतानाही भिंवडी मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फायदा घेण्यात काँग्रेसला अपयश आले. पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे स्थानिक नेते आक्रमक भूमिकेत असतानाही त्यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची याचा घोळ काँग्रेस नेते घालत बसले. याचा फटका पक्षाला बसला. तरीही भिवंडी महापालिका हद्दीतील मतदारांनी ५२ हजाराचे मताधिक्य काँग्रेसच्या पारडय़ात टाकले होते. हा संपूर्ण परिसर मुस्लीम बहुल ओळखला जातो. अडीच वर्षांपूर्वी या भागात झालेल्या महापालिका निवडणुकीत येथील मतदारांनी ९० पैकी ४८ नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून दिले. देशभरात भाजपचा झंझावात असताना येथील मुस्लीम मतदारांनी समाजवादी पक्ष, एमआयएम असे मतांचे विभाजन केले नाही आणि काँग्रेसला एकहाती सत्ता दिली. असे असतानाही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला या भागातील दोन्ही मतदारसंघांतून पराभवाचे तोंड पाहावे लागले. कल्याण पश्चिमेत भाजपचे विद्यमान आमदार महेश चौगुले यांच्याविरोधात अगदी सुरुवातीपासून वातावरण होते. मात्र, कुणाच्या खिजगणतीतही नसलेले अशपाक शोएब यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने स्वतच्या पायावर धोंडा मारून घेतला. येथे राष्ट्रवादीकडून खालीद गुड्डू यांनी केलेली बंडखोरी थोपविण्यातही काँग्रेसला यश आले नाही. त्यामुळे झालेल्या मतविभाजनात ही जागा भाजपनेजिंकली. भिवंडी पूर्व भागातही ऐनवेळी भाजपमधून काँग्रेस पक्षात आलेल्या संतोष शेट्टी यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने मुस्लीम मतदारांची नाराजी ओढवून घेतली. येथे सपाचे मुंबईतील नगरसेवक रईस शेख निवडून आले. देशभरात आलेल्या मोदी लाटेनंतरही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भिवंडी महापालिका हद्दीत ५२ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे विधानसभेच्या येथील दोन्ही जागा काँग्रेस सहजजिंकेल असेच वातावरण होते. असे असताना केवळ उमेदवारांची निवड चुकल्याचा फटका काँग्रेसला बसला होता.

महापौर निवडणुकीतही गाफीलपणा

९० जागांच्या महापालिकेत काँग्रेस पक्षाचे ४८ नगरसेवक असल्याने आपण ज्याच्या गळ्यात माळ टाकू तो महापौर होईल अशा भ्रमात काँग्रेसचे राज्य पातळीवरील नेते राहिले. या ४८ नगरसेवकांमध्ये अधिक संख्येने मुस्लीम नगरसेवकांचा समावेश होता. त्यामुळे जावेद दळवी यांच्या पाठोपाठ याच समाजातील नगरसेवकाची महापौरपदी निवड करावी असा एका मोठय़ा गटाचा आग्रह होता. या आग्रहाला श्रेष्ठी जुमानत नाहीत हे पाहून पक्षातील १८ नगरसेवकांचा गट कोणार्क आघाडी आणि भाजपच्या स्थानिक धनाढय़ नेत्यांच्या गळाला लागला. या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर घोडेबाजार होणार हे स्पष्टच होते. तरीही काँग्रेसचे नेते गाफील राहिले. निवडणुकीची सूत्रे आमच्या हाती द्या, आम्ही भाजपला पाहून घेऊ असे शिवसेनेचे स्थानिक नेते अगदी कालपर्यंत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना सांगत होते. मात्र, पक्षादेश काढून स्वस्थ बसलेल्या नेत्यांनी संभाव्य फुटीकडे कानाडोळा केला. त्याचा फटका पक्षाला बसल्याचे स्पष्ट झाले आहे.