नोटिसांना मंडळांच्या वाकुल्या; रस्त्यांवर मंडप उभारल्याने सर्वसामान्य त्रस्त
रस्त्याचा अर्धाअधिक भाग अडवून गणेशोत्सवाचे मंडप उभे करणाऱ्या मंडळांना नेहमीप्रमाणे नोटिसा बजावून महापालिकेने पुन्हा एकदा कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याचे चित्र उभे केले असले तरी या नोटिसांना वाकुल्या दाखवत मंडळांनी राजरोसपणे ठाणेकरांची कोंडी सुरूच ठेवल्याचे चित्र जागोजागी दिसू लागले आहे. गेल्या दीड वर्षांत ठाणे, कळवा आणि मुंब्रा यांसारख्या भागांत अतिक्रमणविरोधी कारवाईचा धडाका लावत महापालिकेचा दबदबा निर्माण करणारे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गणेश मंडळांच्या या नव्या अतिक्रमणांकडे अक्षरश: मान तुकवल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील ठरावीक भागात नवे कोरे रस्ते उभे राहावेत यासाठी कंस्ट्रक्शन टीडीआरची आरास मांडणारे जयस्वाल यांनी मंडळांची एवढी धास्ती का घेतली आहे, असा सवालही यानिमित्ताने सुजाण ठाणेकरांमधून उपस्थित होत आहे.
रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने मंडप उभारणीस मुंबईसह सर्वच महापालिकांनी परवानगी देण्याचा निर्णय घेतला असताना ठाणे महापालिकेने मात्र गेल्या वर्षी उत्सवांसाठी आचारसंहिता आखून ठाण्यात कायद्याचेच राज्य सुरू राहील, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. रस्त्यांच्या एकतृतीयांश जागेतच मंडप उभारता येईल आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने उत्सव साजरे करावेत, असे स्पष्ट संदेश महापालिकेने या आचारसंहितेच्या माध्यमातून संबंधितांना दिले होते. मात्र, राजकीय दबाव वाढू लागताच ही मर्यादा एकतृतीयांशऐवजी एक चतुर्थाश अशी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानंतर राज्य सरकारचा हस्तक्षेप आणि राजकीय दबावानंतर उत्सवांसाठी तयार करण्यात आलेली नियमावली पुढे महापालिकेने गुंडाळून ठेवली. असे असले तरी गेल्या वर्षी कायदा धाब्यावर बसविणाऱ्या तब्बल १२७ गणेश मंडळांना महापालिकेने प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठाविण्याचा निर्णय घेतला. तसेच मुख्यमंत्री साहाय्य निधीत हा दंड भरावा, असे आदेशही महापालिकेने काढले. मात्र, त्याविरोधात राजकीय दबाव वाढू लागताच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाईचे हत्यार पुढे आश्चर्यकारकरीत्या मान्य केले. त्यामुळे नियम मोडून मंडप थाटणाऱ्या मंडळांना चेव चढला असून जयस्वाल यांना कुणीही जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of mandaps on roads by ganpati mandals in thane
First published on: 30-08-2016 at 01:56 IST