तक्रारदारास ३० हजार रुपये देण्याचा ग्राहक मंचचा आदेश

कोकण म्हाडाने बांधलेल्या घराच्या सोडतीत क्रमांक लागल्यानंतर घराचे पूर्ण पैसे भरूनही आवश्यक कागदपत्र नसल्याचे सांगून तक्रारदाराला घराचा ताबा नाकारणाऱ्या प्रशासनाला ग्राहक मंचच्या एका आदेशामुळे चपराक बसली आहे. ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारदारांना ताबडतोब घराचा ताबा द्यावा; तसेच आर्थिक आणि मानसिक त्रासाबद्दल ३० हजार रुपये दिले जावेत, असे आदेश दिले आहेत.

ठाणे परिसरातील बाळकुम येथे कोकण म्हाडातर्फे घरांची उभारणी करण्यात आली आहे. ठाण्यात राहणाऱ्या सुकराम कोळी यांनी या घरांच्या खरेदीसाठी रीतसर अर्ज केला होता. अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवलेल्या आरक्षित कोटय़ातील सोडतीत भाग्यवान विजेते ठरले. घरासाठी अर्ज करताना या सदनिकेची किंमत दोन लाख असल्याचे सरकरी अर्जात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार सुकराम कोळी यांनी वेळोवेळी घराचे पूर्ण पैसे भरले. या घराचा ताबा २००२ साली देण्यात येणार होता. परंतु २००२ साली ताबा देण्यात येणार नसून तो २०१० साली देण्यात येईल असे सांगण्यात आले. २०१० साल उजाडल्यानंतरही कोळी यांना घराचा ताबा दिला गेला नाही. या कालावधीत जातपडताळणी संदर्भातील कोणता पत्रव्यवहारही प्रशासनाने कोळी यांच्यासोबत केला नाही. या काळात कोळी यांनी १ लाख १४ हजार ५० रुपये एवढी रक्कम आणि मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी ठाणे येथे भरले होते. घराचे पैसे पूर्ण भरल्याचा पोचपावत्यादेखील मुद्रांक कार्यालयातून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर १० जुलै रोजी २०१३ रोजी जात पडताळणीचे कागदपत्र कोळी यांच्याकडून मागविण्यात आले. या वेळी कोळी यांच्यासोबत अर्ज केलेल्या इतर सदनिका धारकांना त्यांचा घराचा ताबा देण्यात आला होता. कोळी यांनी वकिलामार्फत जातपडताळणीसाठी घरातील कोणतीही ज्येष्ठ व्यक्ती हयात नसल्याने जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे म्हाडा प्रशासनाला कळविले. तसेच ज्येष्ठ नागरिक असून विस्मृतीचा आजार जडल्याचेही कळविले होते.

‘मग मुद्रांक शुल्क का घेतले?’

कोळी यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर केले नसतानाही त्यांना याविषयी समज का देण्यात आली नाही. तसेच प्रमाणपत्राशिवाय मुद्रांक शुल्क तसेच इतर रक्कम कशी वसूल करण्यात आली असा सवाल ग्राहक न्यायालयाने म्हाडा प्रशासनाला केला आहे. यावर म्हाडा प्रशासनाकडून ग्राहक मंचास ठोस उत्तर देण्यात आले नाही. दोन्ही बाजू ऐकून ग्राहक मंचच्या अध्यक्ष स्नेहा म्हात्रे यांनी कोळी यांना जातपडताळणी कागदपत्रांची पूर्तता करण्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.