पुरेशी क्षमता नसतानाही मोठाली आश्वासने देत प्रत्यक्ष सोहळ्याच्या दिवशी मात्र अव्यवस्थेचा बाजार मांडणाऱ्या मंगल कार्यालयांतील ढिसाळ व्यवस्थापनाचा अनुभव अनेकांनी यापूर्वी घेतला आहे. ठाण्यातील गोखले मार्गावरील प्रसिद्ध श्री मंगल कार्यालयाला विरोधात अशाच स्वरूपाची तक्रार घेऊन ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठविणाऱ्या वधुपक्षाच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपये परत द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
एम. एम. नवघरे यांनी २९ मे २०१२ रोजी गोखल मार्गावरील श्री मंगल सभागृहात मुलीच्या विवाहाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी गोखले रोड, नौपाडा येथील मंगल कार्यालय येथे फ ोन करून ६०० माणसांची व्यवस्था होईल का असे विचारले. मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनांनी ६०० माणसांची व्यवस्था होईल, असे सांगितल्याने आपण सभागृह आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे नवघरे यांचे म्हणणे आहे. तसेच १० मे रोजी आगाऊ ४०००० हजार रुपये दिले. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी सभागृहाची पाहणी केल्यानंतर हे सभागृह ६०० माणसांच्या क्षमतेचे नवघरे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी काही रक्कम वजा करून उरलेले पैसे द्या आणि आरक्षण रद्द करा असे सांगितले. मात्र कार्यालयातील व्यवस्थापनाने यापैकी काही रक्कम फ्लॉवर डेकोरेटर, आचारी, केटर्स, स्वच्छता करणारे क्लीनर यांना आगाऊ दिल्याचे सांगून हात वर केले.
नवघरे यांनी या प्रकरणी ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदवली. तसेच सभागृह रद्द केल्याचे पत्र नवघरे यांनी व्यवस्थापनाला दिल्याचा पुरावा मंचामध्ये सादर केला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून ग्राहक मंचाचे सदस्य माधुरी विश्वरूपे यांनी श्री मंगल कार्यालयातर्फे ग्राहकाला २५ हजार रुपये द्यावे तसेच ३१ मार्चपर्यंत हे पैसे दिले नाहीत तर त्यानंतर दरसाल दर शेकडा ९ टक्के याप्रमाणे ती रक्कम ग्राहकाला देण्याचे आदेश दिले.