कळव्यातील यशवंत रामा साळवी तरणतलावाच्या दुरुस्तीचा ठराव मंजूर होऊनही महापालिका प्रशासनाने त्याची अद्याप अंमलबजावणी केली नसल्याची माहिती शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी उघड केली. या निष्काळजीपणामुळे तरणतलावाचे पाणी दूषित बनले असून सर्वत्र हिरवा थर साचला आहे, अशी माहिती यावेळी काही सदस्यांनी दिली. दरम्यान, तलावाच्या दुरुस्तीकरिता तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लावून धरताच येत्या आठवडाभरात या कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी प्रशासनाला दिले.
कळवा येथील मनीषानगर भागात यशवंत रामा साळवी तरणतलाव असून हा तलाव महापालिकेमार्फत चालविण्यात येतो. मात्र, या तलावाच्या देखभालीत दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून पुढे येऊ लागल्या आहेत. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून या तलावातील पाण्यावर शेवाळ आले आहे.
जलतरणपटूंची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी अनेकजण येत असतात, त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टी आधी तरणतलावाची डागडुजी पूर्ण करावी, अशी मागणी नगरसेविका अर्पणा साळवी यांनी केली. दरम्यान, येत्या आठवडाभरात या तलावाच्या कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलतरणपटूंचे आरोग्य धोक्यात
पोहण्याच्या सराव करण्यासाठी येणाऱ्यांना अंगाला खाज सुटणे, डोळे चुरचुरणे, खोकला येणे आदी त्रास जाणवत आहेत. या शेवाळामुळे जलतरणपटूंच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी या तरणतलावाच्या शुल्कामध्ये १० ते १५ टक्के वाढ करण्यात आलेली असतानाही तलावातील पाण्याची साफसफाई होत नसल्याचे यामुळे उघड झाले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contaminated water in swimming
First published on: 21-03-2015 at 12:01 IST