डोंबिवली : कल्याण शीळ रस्त्यावरून सुयोग हाॅटेल आणि रिजन्सी अनंतम संकुल प्रवेशद्वारसमोरून डोंबिवलीत प्रवेश करताना वळण रस्ता आहे. या रस्त्याच्या सुरूवातीला एका ठेकेदाराने भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम गेल्या आठवड्यात केले. हे काम केल्यानंतर भूमिगत वाहिनीवर मातीचा भराव टाकून रस्ता सुस्थितीत न करता ओबडधोबड केला आहे. या ओबडधोबड, उंचवट्या रस्त्यामुळे या भागातून वाहने संथगतीने धावत असल्याने डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे.
शीळ रस्त्यावर रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोरील डोंबिवलीत वळण घेण्याच्या मार्गावर भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू होते. त्यावेळी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम केल्यानंतर रस्ता सुस्थितीत करण्याची सूचना ठेकेदाराला केली होती. ठेकेदाराने सकारात्मक भूमिका घेऊन रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन दिले होते. ठेकेदाराच्या कामगारांनी हे काम पूर्ण केल्यानंतर रस्ता सुस्थितीत न करता भूमिगत वाहिनीसाठी खोदलेल्या भागावर चिकट माती टाकून खोदलेला खड्डा बुजविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधका सारखा ओबडधोबड उंचवटा निर्माण झाला आहे.
हा उंचवटा पाऊस सुरू झाला की चिकट होतो आणि त्यावरून वाहनांचे टायर घसरतात. दुचाकी स्वार घसरून पडतात. या निसरड्या उंचवट्यावरून शीळ रस्त्यावरून, रिजन्सी अनंतममधून, कल्याणकडून येणारी जाणारी वाहने डोंबिवलीत प्रवेश करताना, बाहेर पडताना संथगतीने धावतात. त्यामुळे या चौकात दररोज सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. याठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असुनही रस्त्यावरील खडबडीत आणि भूमिगत वाहिकेवर टाकलेल्या मातीच्या उंचवट्यामुळे या भागात वाहन कोंडी होते.
हा उंचवटा प्रवासी, वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांची डोकेदुखी झाली आहे. हे काम करून गेलेल्या ठेकेदाराचा संपर्क क्रमांक जवळ नसल्याने आता हे काम सांगायचे कोणाला असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे. रस्त्यावर खोदकाम केल्यानंतर तो रस्ता काम झाल्यानंतर सुस्थितीत करून देण्याची जबाबदारी रस्ते ठेकेदाराची आहे. याठिकाणच्या ठेकेदाराने रस्ता सुस्थितीत न करता वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने काम करून ठेवले आहे. या भूमिगत वाहिनीसाठी परवानगी देणाऱ्या शासकीय यंत्रणेने या रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. शीळ रस्त्यावरील मेट्रोच्या कामांमुळे अगोदरच प्रवासी हैराण आहेत. त्यात आता या उंचवट्या खडबडीत रस्त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने प्रवासी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
डोंबिवलीत प्रवेश करण्याच्या रिजन्सी अनंतम समोरील रस्त्यावर भूमिगत वाहिनीवरील ओबडधोबड काम आणि उंचवट्यामुळे याठिकाणाहून वाहने संथगती धावतात. त्यामुळे या भागात कोंडी होते. वाहतूक पोलीस तैनात असुनही उंचवट्यामुळे चालक वाहने सावकाश चालवितो. संबंधित यंत्रणेने ठेकेदाराला रस्त्यावरील उंचवटा भाग सुस्थितीत करण्याची सूचना करावी. सचिन सांडभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग.