ठाणे : कामाचे कंत्राट मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेले ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना अचानक पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. मुरुडकर यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुजू करून घेण्यात आले आहे. या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध करत त्यांचे निलंबन कायम ठेवण्याची मागणी केली आहे. 

ठाणे महापालिकेच्या करोना केंद्रांमध्ये व्हेंटिलेटर पुरवण्याचे काम मिळवून देण्यासाठी एका कंत्राटदार कंपनीकडून डॉ. राजू मुरुडकर यांनी १५ लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याआधारे या विभागाने नवी मुंबईत सापळा रचून डॉ. मुरुडकर यांना पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना अटक केली होती. त्यानंतर महापालिकेने त्यांना निलंबित केले होते.

रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटरची गरज भासत होती. त्याच काळात आरोग्य विभागाच्या प्रमुखाकडून त्याच्या पुरवठय़ासाठी लाच घेतल्याचा प्रकार समोर आला होता. ही वृत्ती म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीका झाली होती. या प्रकारामुळे पालिकेची नाचक्की झाली होती. मात्र, आता डॉ. मुरुडकर यांना पुन्हा सेवेत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू करून घेण्यात आले आहे.

महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार डॉ. मुरुडकर यांना सेवेत पुन्हा घेण्यात आले असल्याचा दावा पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला आहे. दैनंदिन वैद्यकीय कामासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना स्वाक्षरीचे कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत काही वर्षांपूर्वी एका लाचखोर कार्यकारी अभियंत्याला तब्बल पाच वर्षे सेवेत घेण्यात आले नव्हते. तर अतिरिक्त महापालिका आयुक्त दर्जाचा अधिकारी चार वर्षे उलटल्यानंतरही सेवेत परतू शकलेला नाही. असे असतानाही ठाणे महापालिकेत भ्रष्ट डॉ. राजू मुरुडकर यांच्यासाठी ैलाल गालिचाह्णह्ण अंथरण्यामागे कोण आहे, असा प्रश्न भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. राजू मुरुडकर यांच्यावर लाच प्रकरणात केलेल्या कारवाईची माहिती आणि गेल्या तीन वर्षांच्या काळात लाच प्रकरणात कारवाई झालेल्या महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती देण्याची मागणी भाजपने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या व्यक्तीचे आरोपपत्र दाखल झाले असेल तर त्याला ९० दिवसांनंतर सेवेत दाखल करून घेता येते. या नियमाच्या आधारेच डॉ. मुरुडकर यांना सेवेत रुजू करून घेतले आहे. – मारुती खोडके, उपायुक्त, ठाणे महापालिका