दवाखान्यातील गर्दीत वाढ, वातावरण बदलाचा परिणाम
ठाणे : करोना रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होत असतानाच वातावरण बदलामुळे मागील दोन दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. विलगीकरण आणि इतर नियमांचे पालन करावे लागू नये म्हणून हे रुग्ण करोना चाचणी करण्याचे टाळत आहेत. घरातच उपचार किंवा जवळील खासगी डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दवाखान्यात या रुग्णांची गर्दी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील करोना रुग्णांचा आकडा हा तीन हजारांच्या पार गेला आहे. त्यात, वातावरणात झालेल्या बदलामुळे सगळीकडे सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरली आहे. सध्याच्या करोना संसर्गाची लक्षणेही सारखीच आहेत. त्यामुळे अनेक नगरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील छोटय़ा दवाखान्यांत साथीचे आजार असलेल्या रुग्णांच्या संख्येत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दवाखान्यांत दिवसाला १५० ते २०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे. करोनाची लक्षणेही सारखीच असल्यामुळे अनेक जण करोना चाचणी करण्यास पुढाकार घेत नाहीत. चाचणी केल्यानंतर बाधित आढळल्यास विलगीकरणात राहावे लागेल, त्यामुळे अनेक जण चाचणी करण्यास टाळाटाळ करत असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. एखाद्या रुग्णास सतत तीन दिवस ताप, सर्दी किंवा अंगदुखी असेल तर त्याला करोना चाचणी करण्याचे डॉक्टरांकडून आवाहन केले जात आहे.
वातावरण बदलामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यात, करोना संसर्गाची लक्षणेही अशीच असल्यामुळे एखाद्या रुग्णामध्ये ही लक्षणे सतत तीन दिवस आढळून आल्यास त्यांना करोना चाचणी करण्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार, पुढील उपचार करण्यात येत आहेत.
– डॉ. नंदकुमार ठाकूर, कोपरी.