खासगी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी; अतिदक्षता विभागातील १ हजार ९८५ खाटा शिल्लक

ठाणे : जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने गेल्या चार महिन्यांपासून ओस पडलेली रुग्णालये पुन्हा भरू लागली आहेत. जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पुढे येत असलेल्या माहितीनुसार अजूनही संपूर्ण जिल्ह्य़ात चार हजारांपेक्षा अधिक खाटा रिकाम्या असल्याचा दावा केला जात असला तरी करोनाबाधित आणि त्यांच्या नातेवाईकांना मात्र खाटांअभावी तिष्ठत राहावे लागत असल्याचा अनुभव येत आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई यांसारख्या शहरांमधील खासगी रुग्णालयांमध्ये अतिदक्षता तसेच सामान्य विभागातील खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी असून महापालिकेतील यंत्रणांकडून प्रतीक्षा यादीत असल्याचे सांगितले जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

शासकीय यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्य़ात रुग्ण उपचारासाठी एकूण ११ हजार ९६७ खाटा उपलब्ध असून त्यापैकी ४ हजार ३११ खाटा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. अतिदक्षता विभागातील १ हजार ९८५ पैकी ९३१ खाटा शिल्लक आहेत. असे असले तरी जिल्ह्य़ामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील खासगी करोना रुग्णालये भरली आहेत. ठाणे महापालिकेच्या करोना रुग्णालयातही केवळ ३४४ खाटा रिकाम्या असल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतही प्रमुख खासगी करोना रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात मार्च महिन्यापासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्य़ात १९ मार्चला शहरात १ हजार ९४९ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर जिल्ह्य़ात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत गेली असून २५ मार्चला रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला होता. २८ मार्च रोजी जिल्ह्य़ात त्यापेक्षा जास्त म्हणजेच तीन हजार ७७७ रुग्ण आढळून आले होते, तर २९ मार्चला जिल्ह्य़ात ३ हजार १४४ रुग्ण आढळून आले होते. तसेच गेल्या अकरा दिवसांत जिल्ह्य़ात ३० हजार ३३८ रुग्ण आढळून आले होते. जिल्ह्य़ामध्ये गेल्या चार महिन्यांत करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. यामुळे जिल्ह्य़ातील बरीच करोना रुग्णालये बंद केली होती. मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच बंद केलेली रुग्णालये पुन्हा सुरू करण्यात आली.  रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता ही रुग्णालये आता अपुरी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाणे जिल्ह्य़ात रुग्ण उपचारासाठी एकूण ११ हजार ९६७ खाटा उपलब्ध असून त्यात अतिदक्षता विभागातील १ हजार ९८५ पैकी ९३१ खाटा आहेत. सध्या एकूण खाटांपैकी ४ हजार ३११ खाटा शिल्लक असून त्यात अतिदक्षता विभागातील १ हजार ९८५ पैकी ९३१ खाटा शिल्लक आहेत.

ठाणे शहरातील खासगी रुग्णालये भरली

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. १८ मार्चला शहरात ४२१ रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या दहा दिवसांत शहरात एकूण ७ हजार ८९७ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच शहरात दररोज सरासरी ९०० ते ११०० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये घोडबंदर भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे रुग्ण वाढत असतानाच आता ठाणे महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालये भरल्याची बाब समोर आली असून त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या करोना रुग्णालयातही केवळ ३४४ खाटा रिकाम्या आहेत. त्यामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयाचा समावेश आहे. या रुग्णालयातील ३०० पैकी २२७ खाटा शिल्लक आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.