लस तुटवड्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण
ठाणे : राज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्याला उपलब्ध झालेला ४२ हजार लशींचा साठा शनिवारीच संपल्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ शहरात लसीकरण मोहीम सोमवारी ठप्प होती.
लसतुटवड्यामुळे भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि ग्रामीण भागातील अनेक लसीकरण केंद्रे बंद होती. नवीन साठा उपलब्ध झालेला नसल्यामुळे रडतखडत सुरू असलेली ही केंद्रेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहिमेत पुन्हा व्यत्यय निर्माण झाला असून लसतुटवड्याच्या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. करोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महापालिकांसह जिल्हा परिषदेने लसीकरण मोहिमेचा वेग गेल्या काही दिवसांपासून वाढविला आहे. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात लसतुटवडा जाणवू लागला आहे. यामध्ये कोव्हिशिल्ड लशीचा सर्वाधिक तुटवडा जाणवत आहे. लसतुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय येत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या आठ दिवसांत एकच दिवस लसीकरण मोहीम सुरू होती. तसेच जिल्ह्यातील भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांसह ग्रामीण भागातही पुरेसा लससाठा शिल्लक नसल्यामुळे येथेही लसीकरण मोहीम बंद होण्याच्या मार्गावर होती. असे असतानाच शुक्रवारी सकाळी राज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्याला ४२ हजार ६०० लशींचा साठा उपलब्ध झाला. त्यात २७ हजार ४०० कोव्हिशिल्ड तर, १५ हजार २०० कोव्हॅक्सिन लशींचा समावेश होता.
लशींचा साठा उपलब्ध झाल्याने ठाणे आणि बदलापूर शहरामध्ये चार दिवसांनंतर शनिवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामुळे पुरेशी लस शिल्लक राहिली नसल्यामुळे ठाणे पालिकेने सोमवारी लसीकरण बंद ठेवले होते. कल्याण-डोंबिवली पालिकेने शुक्रवारी लसीकरण केंद्रे सुरू ठेवली होती. त्याच दिवशी लससाठा संपल्यामुळे शनिवारपासून शहरात लसीकरण ठप्प आहे.
अंबरनाथ, भिवंडी, बदलापुरातही मोहीम बंद
अंबरनाथ शहरातही लसीकरण बंद होते. लस तुटवड्यामुळे भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि ग्रामीण भागातील अनेक लसीकरण केंद्रे बंद होती. उल्हासनगरमध्ये २, बदलापूरमध्ये १ आणि ग्रामीण भागात १७ लसीकरण केंद्रे सुरू होती. नवीन साठा उपलब्ध झालेला नसल्यामुळे रडतखडत सुरू असलेली ही केंद्रेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ठाणे जिल्हा रुग्णालयातही लसीकरण बंद होते. दरम्यान, सोमवारी रात्री लशींचा नवीन साठा उपलब्ध होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.