ग्रामस्थांच्या मदतीने अटकाव घालण्याचा निर्णय

ठाणे : शिथिलीकरणानंतर पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने ग्रामीण भागांत पर्यटकांची वर्दळ वाढून करोनाचा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने ८ जूनपासून पावसाळी पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी जाहीर केली आहे. मात्र, तरीही अनेक पर्यटक पोलिसांची नजर चुकवून या पर्यटन स्थळांवर जात असल्याचे गेल्या दोन आठवड्यांत आढळले आहे. त्यामुळे या पर्यटकांना रोखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

करोना रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याने राज्य सरकारने टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्याचे नियोजन आखले आहेत. ठाणे जिल्ह्यातील खाडी किनारा, धबधबे, तलाव आणि धरण या ठिकाणी जिल्ह्यासह मुंबई, उपनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांतून पर्यटक येत असतात. अनेकदा अतिउत्साही पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढतो. जीवितहानी रोखण्याबरोबरच करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हानदेखील जिल्हा प्रशासनासमोर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ८ जूनपासून पर्यटन स्थळावर पर्यटकांना येण्यास बंदी घातली. मात्र, तरीही या पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. नुकतीच येऊरमधील नील तलावात एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाने या पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेसह ग्रामस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना रोखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांना केले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाच्या या नियमांचे पालन करावे. – राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे