लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत बुधवारी ३९२ करोना रुग्ण आढळून आल्याने शहरातील करोनाची परिस्थिती गेल्या वर्षीसारखी चिंताजनक होऊ नये म्हणून सावध झालेल्या प्रशासनाने सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेल्या भागात सोडियम हायपोक्लोराईड आणि जंतुनाशकाची फवारणी सुरू केली आहे. गुरुवार सकाळपासून आरोग्य विभागाचे कामगार हातपंप, वाहने घेऊन फवारणी करीत होते.

टिटवाळा, कल्याण, डोंबिवली ते कोपर, आयरे या १० प्रभागांच्या हद्दीत वेळ, तारखेप्रमाणे धूर फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे. पाचहून अधिक रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती तात्काळ सील केल्या जात आहेत. करोनाची बाधा झालेल्या रुग्णाने घराबाहेर, सोसायटी आवार, गच्ची आणि उद्वाहनाचा वापर करू नये अशा सूचना केल्या जात आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, अशा रुग्णाविषयी तक्रार आली तर त्याच्यावर कारवाईचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धूर फवारणी, जंतुनाशक फवारणीचे नियोजन केले जात आहे. या सुविधेसाठी ११ मल्टीजेट वाहने, चार जीप माऊंटेड फॉग मशीन, ३१ हातपंप वापरण्यात येणार आहेत. दिवसा ऊन आणि वाहनांची वर्दळ असल्याने रात्री १० वाजल्यानंतर सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेल्या प्रभागांमध्ये सोडियम क्लोराईडची फवारणी करण्यात येणार आहे.