नुकताच देशभरात गणपती उत्सव साजरा करण्यात आला. सर्वांनी जड अंत:करणानं बाप्पाला निरोप दिला. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीमुळे राज्यभरात एकदम साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्वांनी बाप्पाचा उस्तव साजरा करताना सर्व नियम पाळले आहेत. पण कल्याण येथे : गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील ३० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

कल्याण येथील जोशीबाग परिसरील एका चार मजली इमरतीत राहणारा एक मुलगा पहिल्यांदा करोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्या मुलाच्या संपर्कात आसलेल्या ४० जणांची करोना चाचणी करण्यात आली. ४० पैकी ३० जणांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. गणपती दरम्यान संपूर्ण परिवार एकत्र आला होता. कल्याण डोंबवली महानगरपालिकाच्या (केडीएमसी) अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी करोनाचे १ हजार ६४३ नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३० हजार ७२ वर पोहोचली आहे. दिवसभरात २५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या ३ हजार ६६८ झाली आहे. महिनाभरापासून जिल्ह्यात काहीसा आटोक्यात आलेला करोनाचा प्रादुर्भाव गणेशोत्सवानंतर वाढू लागला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात नोंद झालेल्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ४८६, नवी मुंबईतील ४५८, ठाणे शहरातील २७८, मीरा-भाईंदरमधील १८४, ठाणे ग्रामीणमधील ८३, बदलापूरमधील ७९, उल्हासनगर शहरातील २७, अंबरनाथमधील २६ आणि भिवंडी शहरातील २२ जणांचा समावेश आहे.