लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बैलगाडा शर्यतींच्यावेळी एका गटाने दुसऱ्या गटावर केलेला हल्ला आणि हवेतील गोळीबार प्रकरणी अटक असलेल्या १६ जणांचा जामीन ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील ‘मोक्का’ न्यायालयाचे विशेष न्यायाधिश अमित शेटे यांनी फेटाळला. योग्य तपास करुन सर्व प्रक्रिया कायद्याने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अर्जदार जामीन मिळण्यास पात्र नाहीत, अशी टीपणी न्या. शेटे यांनी केली.

राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्यानंतर अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राहुल पंडित पाटील यांच्या तक्रारीवरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करुन हल्लोखोरांवर महाऱाष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याने (मोक्का) गुन्हा दाखल केला होता. हल्ल्याच्यावेळी सुमारे ३५ जण उपस्थित होते. यावेळी हवेत गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे काही दिवस या भागातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

आणखी वाचा- शिळफाट्यात माफियांकडून कच्च्या तेलाची चोरी, आगीमुळे धक्कादायक वास्तव उघड

आरोपी पंढरीनाथ फडके आणि इतरांनी दाखल केलेल्या जामीन अर्जात आरोपींची अटक, दाखल झालेले आरोपपत्र यामधील विसंगती आणि त्यामुळे जामीन देण्यात होत असलेला विलंब यावर बोट ठेवण्यात आले होते. या जामीन अर्जाला विशेष सरकारी वकील ॲड. विनीत कुलकर्णी यांनी प्रखर विरोध केला. आणि कायद्याच्या कसोटीवर अर्जदारांची जामीन देण्याची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. पोलिसांनी योग्यरितीने तपास, अटक प्रक्रिया आणि आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण केली आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

आणखी वाचा- अंबरनाथ : ठाकरे समर्थकांकडूनच उद्धव, आदित्य ठाकरेंचे छायाचित्र शाखेबाहेर; उरलेले उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारीही शिवसेनेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून घेऊन जामीनासाठी अर्ज करणारे मोक्का आरोपी पंढरीनाथ फडके, एकनाथ दत्तू फडके, हरिश्चंद्र फडके, संदेश उर्फ पप्या अनंता फडके, समीर कुटले, प्रशांत नाथा फडके, सतिश आंबो फडके, महेश बळीराम म्हात्रे, संदीप जाळे, गुरुनाथ फडके, मंगेश फडके, अक्षय फडके, संतोष पाटील, राजेश कठार, विश्वास पाटील आणि मंगेश जनार्दन कुटले यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.