मोफत उपचार मिळणार असल्याने ठाण्यातील रुग्णांना दिलासा; मनोरंजनाच्या सुविधा, मानसिक तणाव दूर होण्यास मदत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये खाटाच मिळत नसल्याची टीका होत असतानाच, ठाणे महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि क्रेडाई एमसीएचआय, ठाणे युनिटच्या संयुक्त विद्यमाने शहरात अवघ्या २४ दिवसांत खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर तब्बल १०२४ खाटांचे भव्य तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी मोफत उपचार केले जाणार असल्याने शहरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून त्याचबरोबर या ठिकाणी मनोरंजनाच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांचा मानसिक ताणही दूर होण्यास मदत होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी रुग्णालयाचे ई-लोकापर्ण करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून या रुग्णांना उपचारांसाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांत खाटा मिळत नसल्याची ओरड होत आहे. या मुद्दय़ावरून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनावर सातत्याने टीका केली जात आहे. असे असतानाच ठाणे महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमसीएचआय, ठाणे युनिट यांच्या वतीने शहरात १०२४ खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले. शहरातील रुग्णांना तात्काळ आणि मोफत उपचार मिळावेत, यासाठी अशा प्रकारचे रुग्णालय उभारण्याच्या सूचना जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार अवघ्या २४ दिवसांत या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या रुग्णालयाच्या उभारणीचा नकाशा आणि तांत्रिक साहाय्य ज्युपिटर रुग्णालयाने विनामूल्य केले आहे.

या रुग्णालयात भोजन, रुग्णांना युनिफार्म, पॅथालाजी लॅब, एक्स रे, करोना टेिस्टग लॅब आणि मनोरंजनासाठी टीव्ही तसेच लॉकरचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खाडी परिसरालगतच हे रुग्णालय असून निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आलेले हे रुग्णालय रुग्णांसाठीही योग्य ठरणार आहे.

१० मजल्यांचे रुग्णालय

’ तळमजला अधिक १० मजल्यांच्या इमारतीत हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ५०० खाटा आहेत. यापैकी ७६ खाटा आयसीयूच्या असून १० खाटा डायलेसिस रुग्णांसाठी तर १० खाटा ट्राएजसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

’ या इमारतीच्या तळमजल्यावर २४ आयसीयू खाटा, १० खाटा डायलेसिस रुग्णांसाठी, १० खाटचा ट्राएजसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

’ दुसरा आणि तिसरा मजल्यावर प्रत्येक २६ आयसीयू खाटा आणि ११९ ऑक्सिजनच्या खाटा आहेत. तर चौथ्या मजल्यावर १५५ ऑक्सिजनच्या खाटा आहेत.

’ पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी १५५ साध्या खाटा आहेत. सातव्या मजल्यावर ६९, आठव्या मजल्यावर ६७, नवव्या मजल्यावर ६७ आणि दहाव्या मजल्यावर २२ खाटा आहेत.

’ आवश्यकता वाटली तर या ठिकाणी अतिरिक्त ३०० खाटा निर्माण करण्यात येणार आहेत. या रुग्णालयामध्ये कोविड लॅबचीही सुविधा आहे.

‘तर ही वेळ कुणावरही येऊ नये’

बीकेसी मैदान आणि ठाण्यात युद्धपातळीवर रुग्णालये उभारण्यात आली असून त्याचा मला अभिमान आहे. करोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे नाही तर जगाच्या पुढे आहे. मागील दोन महिन्यांत काही लाख खाटा उपचारांसाठी निर्माण केल्या ही मोठी गोष्ट आहे. आपण रुग्णालये, आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत, मात्र त्याचा वापर करण्याची वेळ कोणावरही येऊ  नये, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रुग्णालय ई-लोकापर्ण कार्यक्रमात व्यक्त केली. मैदानातील रुग्णालये ही तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. मात्र त्या ठिकाणी आपण आयसीयू खाटा, वीज, पाणी सुविधा चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला आहे. आपले राज्य करोनावर मात करेल आणि आपण पुन्हा नव्या उमेदीने पहिल्यासारखे उभे राहू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid hospital with 1024 beds ready in thane city zws
First published on: 18-06-2020 at 00:38 IST