घोडबंदर येथील चितळसर-मानपाडा भागातील स्मशानभूमीत नवीन सरण चौकटीसह विविध सोयी-सुविधा पुरविण्याचे आदेश ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी तब्बल चार महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, महापौरांच्या आदेशाला प्रशासकीय अधिकारी फारसे जुमानत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा पुढे आले असून या स्मशानभूमीची दुरवस्था अजूनही कायम आहे. यासंबंधीचे वृत्त ‘ठाणे लोकसत्ता’मधून प्रकाशित होताच महापौर मोरे घटनास्थळी गेले होते. याठिकाणी तातडीने सुविधा पुरविण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.
चितळसर-मानपाडा भागातील स्मशानभूमीतील चार सरणचौकटी मोडकळीस आल्या असून अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे आणि इतर साहित्य मृतांच्या नातेवाईकांना शहरातील अन्य स्मशानभूमीतून आणावी लागतात. मृत्यूची नोंद करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात पायपीट करावी लागते. यासंबंधी ‘लोकसत्ता ठाणे’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन महापौर संजय मोरे यांनी या स्मशानाचा पहाणी दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी स्मशानभूमीत तातडीने नवीन सरणचौकटी, २४ तास सुरक्षा रक्षक पुरवण्यासह सर्वच सोयी-सुविधा देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने मृत्यची नोंद करण्यासाठी एका लिपीकाची तर एका सुरक्षारक्षकाची नेमणूक केली असून तिथे दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत लिपीक काम करतो तर रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत सुरक्षारक्षक काम करतो. उर्वरित आदेशांची मात्र अद्याप अमलबजावणी झालेली नाही, अशी माहिती शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिली.