कार्यालयातील ग्राहकाशी उलटसुलट बोलू नका, असा सल्ला दिल्याने संतापलेल्या एका तरुणाने मोटार प्रशिक्षण कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. ही मारहाण किरकोळ असल्याचे सांगून सुरुवातीला विष्णुनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्’ाांची नोंद करून घेतली. परंतु, तक्रारदाराने दबाव वाढवल्याने अखेर प्राथमिक तपासणी अहवाल दाखल करून घेण्यात आला.
ममता राव ही महिला डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील ओम मोटार प्रशिक्षण कार्यालयात लिपिक म्हणून काम पाहते. सोमवारी सकाळी त्या कार्यालयात आलेल्या एका ग्राहकाला मोटार प्रशिक्षणाविषयी माहिती देत होत्या. त्यावेळी राहुल रणपिसे हा त्यांचा एक जुना ग्राहक तेथे आला. त्याने माहिती देत असलेल्या ग्राहकाला खुर्चीवर उठवून दुसऱ्या ठिकाणी बसण्यास सांगितले. त्यावेळी ममता यांनी आमच्या ग्राहकांशी असे बोलू नका. तुमचे काय काम आहे ते मी पाहते, असे राहुलला सांगितले. त्याचा राग येऊन राहुलने हातातील लाकडी काठीने त्यांना बेदम मारहाण केली. तसेच कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील कर्मचारी रोनॉल्ड फर्नांडिस यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तेथून पळ काढला. विष्णुनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
कशेळी पुलाजवळ अपघातात तरुणीचा मृत्यू
ठाणे: येथील कशेळी पुलाजवळील जुन्या आग्रा रस्त्यावर सोमवारी रात्री भरधाव मोटारसायकल चालविणाऱ्या शादाब अब्दुल करीम शेख (२९) याने काल्हेर परिसरात राहणाऱ्या श्वेता संजय टिकेकर हिला धडक दिली. त्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोटारसायकल चोरी
ठाणे:  येथील जांभळी नाका परिसरात राहणारे किरण रामचंद्र पवार (२०) या तरुणाची गडकरी रंगायतनजवळील रेड जिमसमोरून शनिवारी मोटारसायकल चोरीस गेली. दिवा येथील बी.आर. नगर परिसरात राहणाऱ्या उत्पल भास्कर गावकर (३६) यांची मोटारसायकल इमारतीच्या आवारातून रविवारी  चोरली. अंबरनाथ येथील आडिवली गाव परिसरात राहणारे अविनाश विनायक उगाडे (३२) यांची मोटारसायकल इमारतीच्या आवारातून सोमवारी चोरली. उल्हासनगर येथील दसरा मैदानाजवळ राहणाऱ्या नितीन राजकुमार रायचंदानी (१८) या तरुणाची मोटारसायकल शुक्रवारी े चोरली.
सोनसाखळी चोरी
ठाणे : येथील तारांगणनगर परिसरात रहाणाऱ्या स्नेहप्रभा प्रल्हाद कटकतलवारे (७२) या सोमवारी सकाळी पतीसोबत नितीन कंपनी बसथांब्याजवळील पदपथावर फेरफटका मारण्यासाठी जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांचे ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. ठाणे येथील तुळशीधाम परिसरात राहणाऱ्या लताकुमार (४५) यांचे सोमवारी कापूरबावडी येथील तत्त्वज्ञान विद्यापीठासमोरील रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरली. अंबरनाथ पूर्व भागात राहणाऱ्या सुषमा प्रदीप देशमुख (४१) यांचे उल्हासनगर येथील शांतीनगर भागात सोमवारी ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने चोरून नेले.
याप्रकरणी पोलीसत गुन्हे दाखल झाले आहेत.
ऐवज लुटला
डोंबिवली: भांडुप येथे राहणारे डॉ. नितीन एकनाथ भोसले (३४) यांनी सोमवारी डोंबिवली पूर्व येथील ममता रुग्णालयासमोर कार उभी केली होती. चोरटय़ाने या कारची काच फोडून बॅगेत ठेवलेली ५० हजारांची रोख रक्कम, दोन मोबाइल असा ऐवज चोरला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झााला आहे.
कल्याणमध्ये टेम्पो चोरी
कल्याण: येथील अन्सारी चौक परिसरात राहणाऱ्या मोहम्मद मलिक अन्वर मेमन (२१) याचा टेम्पो रविवारी चोरीस गेला. मोहम्मद याने एपीएमसी मार्केट परिसरातील दुकान क्रमांक ४६ जवळ टेम्पो उभा केला होता. तेथून चोरटय़ांनी हा टेम्पो चोरून नेला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्यात कारचोरी
ठाणे : येथील वसंतविहार परिसरात राहणारे जयप्रकाश रामचंद्र यादव (३४) यांची कार रविवारी चोरीस गेली. त्यांनी कचनार इमारतीसमोरील सेवा रस्त्यावर कार उभी केली होती. तीन लाख रुपये किमतीची ही कार चोरटय़ाने चोरली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.