डॉक्टरांनी वैद्यकीय प्रमाणपत्र बनावट दिल्याने केवळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
महिलेने केलेल्या चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या बजरंग सिंग यांचा अखेर मृत्यू झाला आहे. मात्र त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने या महिलेवर केवळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर मारहाण असूनही किरकोळ मारहाण असे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिल्याने आरोपी महिलेवर गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
नालासोपारा पूर्वेच्या पाचअंबा येथील लक्ष्मण प्लाझा इमारतीत बजरंग सिंग (४८) हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ३१ जुलै रोजी त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या राजलक्ष्मी मंडल (२७) या महिलेशी त्यांचा वाद झाला. राजलक्ष्मीने सिंग यांच्या घरात घुसून बजरंग सिंग आणि त्यांच्या दोन मुलांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सिंग आणि त्याची दोन मुले निखिल आणि नीरज गंभीर जखमी झाले होते. त्यांना नालासोपारा पूर्वेच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पालिकेने त्यांना सामान्य मारहाण असे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे पोलिसांनी राजलक्ष्मीवर केवळ मारहाणीचा कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, उपचार पंधरा दिवसांनी बजरंग सिंग याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सिंग यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला नाही. या महिलेने केलेल्या हल्ल्यामुळेच सिंग यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
गंभीर मारहाण असताना सामान्य मारहाण असे प्रमाणपत्र पालिके च्या आरोग्य विभागाने का दिले असा सवाल बारोट यांनी केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. बजरंग सिंग याचे शवविच्छेदन करण्यासाठी नालासोपाराच्या प्राथमिक केंद्रात नेले असता तेथे कर्मचारी नसल्याने विलंब झाला तसेच कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागले असाही आरोप बारोट यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे.
बजरंग सिंग यांच्या मृत्यूनंतर आम्ही राजलक्ष्मी मंडल या महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. तिला यापूर्वीच मारहाणीच्या गुन्हय़ात अटक करण्यात आलेली आहे.
– प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज
बजरंग सिंग यांना २० टाके पडले तरी पालिकेच्या डॉक्टरांनी किरकोळ मारहाण असे प्रमाणपत्र दिले होते. त्याचा फायदा आरोपीला झाला. पालिकेचे डॉक्टर संगनमत करून वैद्यकीय अहवाल देत असतात.
– मनोज बारोट, उपाध्यक्ष, नालासोपारा शहर.
