भिवंडी येथील नारपोली भागात मंगळवारी राहणाऱ्या एक महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुष्मा शंकर गिरी (२५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महिलेचा पती, सासरा आणि सासू यांना अटक केली आहे नारपोली येथील कशेळी परिसरात सुष्मा ही तिचे पती शंकर, सासरा विष्णू गिरी आणि सासू वंदना यांच्या सोबत राहत होती. तिचे सासरकडचे तिचा छळ करत होते. या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी शंकर, विष्णू आणि वंदना यांना अटक केली आहे.
प्रेयसीच्या मित्रावर धारदार चाकूने वार
प्रेयसी अन्य तरुणासोबत बोलत असल्याचे सहन न झाल्याने प्रियकराने मित्रांच्या मदतीने तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार दहिसरमध्ये घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक आरोपी फरारी आहे. सुनील ठाकूर (२१), नीरव मखवाना (२१), करण पवार (२०) यांना पोलिसांनी अटक केली असून आशुतोष पुरी फरारी आहे.
आशुतोष आणि इतर आरोपी मुले ठाकूर महाविद्यालयात शिक्षण घेतात. आशुतोष आणि एका मुलीची मैत्री होती. मात्र ही मुलगी अन्य तरुणासोबत मैत्री ठेवत असल्याची गोष्ट आशुतोषला सहन होत नव्हती. याचा राग मनात धरून आशुतोष याने तीन मित्रांना सोबत घेत मैत्रिणीच्या मित्राच्या पोटावर आणि छातीवर धारदार चाकूने वार केले. यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी तरुणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती दहिसर पोलिसांनी दिली.
सराफाच्या दुकानात चोरी
पालघर शहरात पाटकर गल्ली स्थित असलेल्या मंगलराज ज्वेलर्समध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास दोन अज्ञात महिलांनी सुमारे १७ ग्रॅमचे सोने लंपास केले. घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिला सोने खरेदीचा बहाणा करून मंगलराज ज्वेलर्सचे मालक यांना दागिने दाखवा म्हणून गुंतवून ठेवले व यातील एक महिलेने दागिने पाहता पाहता १७ ग्रॅमची सोन्याची साखळी लंपास केली.या साखळीचे बाजारमूल्य ८० हजार आहे. चोरी झाल्याची ही बाब मालकाच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या चित्रफितीच्या आधारे पोलीस महिलांचा शोध घेत आहेत.