गेल्या दोन दिवसांत डोंबिवली आणि कल्याण परिसरात पाच सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या अनुपमा कुलकर्णी या गोग्रासवाडी परिसरातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण पूर्व भागात सुमन सानप राहत असून त्या दूध आणण्याकरिता नूतन हायस्कूलजवळ गेल्या होत्या. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील २६ हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण रामबाग परिसरात सविता रघुवंशी राहात असून त्या परिसरातून पायी जात असताना चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण येथील वल्लीपर रोड परिसरात राहणाऱ्या रजनी मोरे या इमारतीच्या लिफ्टमधून उतरून घरात जात होत्या. त्या वेळी पाठीमागून आलेल्या सोनसाखळी चोराने त्यांचे तोंड दाबून गळ्यातील ३९ हजारांचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण उंबर्डे गावात आशा भंडारी राहात असून त्यांचा भाऊ शालीक मार्देन हा टिळक चौकातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. त्या त्याला पाहण्यासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख ६० हजारांचे सोन्याचे गंठण आणि हार खेचून पोबारा केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे.

डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई
ठाणे : मुंबईतील इमारतींचे खराब बांधकाम साहित्य (डेब्रिज) मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळील खारेगाव ब्रिज ते ओवळा खिंडदरम्यान टाकत असणारे चार ट्रक नारपोली पोलिसांनी सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पकडले. रामरक्षा भरोसा निशाद (४५), मेहबूब आलम अन्सारी (३६), लक्ष्मी पाटील (३०) आणि शरदकुमार मिश्रा (३५) या चार आरोपींच्या मालकीचे हे ट्रक असून हे चारही जण फरार आहेत. या प्रकरणी नारपोली पोलीस तपास करत आहेत.

फेसबुकच्या धुंदीत मोबाइल लांबवला
ठाणे : घराजवळील रस्त्यावर उभे राहून मोबाइलवर फेसबुक पाहण्यात दंग असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाइल मोटरसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना घडली. भिवंडीतील शास्त्रीनगर भागातील मिस्त्री इमारतीत मोहम्मद मोमीन (३०) राहतो. तो घरासमोरील रस्त्यावर उभा होता आणि मोबाइलवर फेसबुक पाहत होता. त्या वेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याच्या हातातील मोबाइल खेचून पळ काढला. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न
डोंबिवली : वेगाने दुचाकी चालवणाऱ्या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न शिळफाटा रस्त्यावर काल घडला. दुचाकीने जोराची ठोकर दिल्याने वाहतूक पोलीस जखमी झाला आहे.
या प्रकरणी दुचाकीस्वार सुरज पालकरी, महेश केणे यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग ढोकरे हे गोळवली येथे वाहतूक नियोजन करीत होते. त्यांच्या समोरून सुरज वेगाने मोटारसायकल घेऊन चालला होता. ढोकरे यांनी ती थांबवण्याचा इशारा केला. त्याचा राग येऊन सुरजने ढोकरेंच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ढोकरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.