thlogo05भूलथापांनी आपल्या जाळ्यात ओढणारा आणि त्यातून पैसे कमविणारा भामटा गुन्हेगारच असतो. पण फसवणूक झाली म्हणून त्या भामटय़ाची हत्या करणाराही तितकाच गुन्हेगार ठरतो. अशा भामटय़ांना अद्दल घडविण्यासाठी कायदे अस्तित्वात असतानाही त्याचा आधार घेण्याऐवजी हिंसक पावले उचलली जातात आणि कळत-नकळत त्यांच्या हातातून एखादा मोठा गुन्हा घडतो. मग पश्चात्ताप करण्यापलीकडे त्यांच्या काहीच हाती राहत नाही. असाच काहीसा मिळता-जुळता प्रसंग ठाण्यात घडला.
मुंब्रा-कौसा भागातील पडले गावात विलास विठ्ठल सावंत (४०) राहायचा. लोकांना गंडा घालून पैसा कमविणे, हाच त्याचा धंदा होता. सरकारी कार्यालये किंवा खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे अधिकारी/कर्मचारी चहाच्या टपऱ्यांवर चहा पिण्यासाठी येतात. अशाच टपऱ्यांवर विलास सावज हेरायचा आणि बोलण्याच्या निमित्ताने त्यांच्याशी जवळीक वाढवायचा. आपले नाव आनंद परब असल्याचेही तो खोटे सांगायचा. जास्त ओळख वाढली की ‘अमूक कंपनीत माझी चांगली ओळख आहे, तेथे तुला नोकरी लावून देतो’ अशा थापा ठोकून तो या लोकांना भुरळ पाडायचा. कुठल्याशा कंपनीत कमी पगाराची नोकरी करणारे किंवा आधीच्या नोकरीला कंटाळलेले तसेच बेरोजगार तरुण विलास ऊर्फ आनंदच्या जाळय़ात फसायचे. मग नोकरी लावून देण्यासाठी तो त्यांच्याकडे पैशांची मागणी करायचा. नोकरीच्या लालसेपोटी अशी मंडळी त्याला पैसे द्यायची. पण मग अचानक एक दिवस विलास ऊर्फ आनंद दिसायचा बंद व्हायचा. सुरुवातीला चालू असणारा त्याचा मोबाइलही बंद झालेला असायचा. अशा प्रकारे विलासने अनेक तरुणांना गंडविले.
ठाण्यातील चितळसर-मानपाडा भागात राहणारा बाबू पठाडे (३१) हाही असाच विलासने गंडवलेल्यांपैकी एक. ‘नोकरी लावून देतो’ असे सांगून महिनाभरापूर्वी विलासने बाबूकडून सहा हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी काही मिळाली नाही. विलासचा मोबाइलही बंद झाला होता. आपले पैसे बुडाले आणि नोकरीही नाही, अशी खात्री पटल्याने बाबू पूर्णपणे हताश झाला. याचदरम्यान बाबूचा मित्र अशोक यालाही एका व्यक्तीने नोकरी लावून देतो, असे सांगून पैशांची मागणी केली. अशोक पैसे देण्यास तयार झाला. पण त्याचवेळी त्याची आणि बाबूची भेट झाली. बोलता बोलता नोकरीचा विषय निघाला आणि आनंद परब नावाचा एक माणूस आपल्याला नोकरी लावून देणार असून आपण त्याला पैसे देत आहोत, असे अशोकने बाबूला सांगितले. आनंदचे नाव पुढे येताच बाबू थबकला आणि त्याने आपली फसवणूक करणारा विलास तर नाही ना, याची खातरजमा केली. वर्णन, बोलण्याची पद्धत यावरून तो आनंद ऊर्फ विलासच असल्याची बाबूची खात्री पटली. त्याने आपली फसवणूक कशी झाली, हे अशोकला सांगितले. मग त्या दोघांनी विलासला अद्दल घडवण्याचे ठरवले.
त्यानुसार अशोकने विलासला फोन करून पैसे घेण्यासाठी बोलावले. पहाटेच्या वेळी मुंब्रा परिसरात ही भेट घेण्याचे ठरले. ठरलेल्या ठिकाणी विलास येताच अशोक व बाबूने विलासला कारमध्ये कोंबून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात तो बेशुद्ध झाला. पण विलास मरण पावला असावा, असे वाटल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी अशोक व बाबूने त्याच्या अंगावरील कपडे व वस्तू काढून घेऊन त्याला एका झाडीत फेकून दिले.
पहाटे फेरफटका मारण्यासाठी आलेल्या काही नागरिकांची नजर त्याच्यावर पडली. त्यावेळी विलास शुद्धीवर आला होता. एका रिक्षाचालकाच्या मदतीने त्याने घर गाठले. तेथून त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याने अपहरण आणि हत्येविषयी पत्नीला माहिती दिली होती. मात्र ते कोण होते, याविषयी काहीच सांगितले नव्हते. याप्रकरणी त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून शीळ-डायघर पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल झाला. ठाणे खंडणीविरोधी पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. काहीच माहिती नसल्याने पोलिसांना काहीच धागेदोरे लागत नव्हते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. टी. कदम यांनी या प्रकरणाचा खोलवर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक संजय साबळे, नासीर कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक फारुख शेख, मनोज प्रजापती तसेच पोलीस हवालदार सुरेश मोरे, संजय सातुर्डेकर, अंकुश भोसले, नितीन ओवळेकर, प्रशांत भुर्के, सुनील विनेरकर, हेमंत महाले, सुहास खताते, शशिकांत निंबाळकर असे सर्वच या प्रकरणासंबंधी वेगवेगळी माहिती गोळा करीत होते. यामध्ये दोन वर्षांपूर्वी विलासला कोपरी पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. हाच धागा पकडून पोलिसांच्या तपासाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये अशोक, बाबू आणि त्यांना मदत करणारा संतोष गिरी, असे तिघे सापडले. अवघ्या दहा दिवसात पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.
खरं तर विलासकडून आर्थिक फसवणूक झाल्यानंतर बाबूने कायद्याचा आधार घ्यायला हवा होता. मात्र भामटा विलासला अद्दल घडवण्यासाठी त्याने अशोक व संतोष यांच्या मदतीने कायदाच हातात घेतला. यामुळे विलास प्राणाला मुकलाच; पण नोकरी करून घर चालवण्याच्या विचारात असलेल्या बाबू आणि अशोकला तुरुंगात जावे लागले.
नीलेश पानमंद