लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेतील वागळे युनिटच्या चौघा कर्मचाऱ्यांपैकी ठाण्यातील शिवाईनगर येथे राहणाऱ्या प्रेमसिंह राजपूत या हवालदाराकडे १६ लाखांची रोकड, तीन घरे अणि चार मोटारसायकल व दोन चारचाकी वाहने सापडली आहेत.
दोन चारचाकी वाहने ही त्याच्या पत्नी आणि भावाच्या नावे असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असले तरी महागडय़ा गाडय़ा प्रेमसिंह याच्या कमाईतूनच घेण्यात आल्या असाव्यात, असा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांच्यासह याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू असून भिवंडीतील बेकायदा गोदाम मालकापर्यंत या चौकशीचे धागेदोरे जोडले जाण्याची शक्यता आहे.
वाडा येथील एका रसायन कंपनीत सुरू असलेल्या रॉकेल आणि फिनेलच्या भेसळीकडे दुर्लक्ष करण्यासाठी गुन्हे अन्वेषण पथकाच्या वागळे शाखेने कंपनी मालकाकडे दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. यापैकी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह तिघा हवालदारांना  अटक केली आहे. यात जाधव यांच्यासह प्रेमसिंग राजपूत, उदय कोरे आणि सुरेश पाटील अशा चौघांचा समावेश आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या चौघांच्या मालमत्तेचा शोध घेण्यास आता सुरुवात केली आहे. याशिवाय राजपूत याची बँकखाती तपासण्याचे काम पोलिसाकडून सुरू आहे. मात्र, त्याचा सविस्तर तपशील अद्याप मिळू शकलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेमसिंग राजपूतची मालमत्ता
’तीन फ्लॅट, एक दुकान आणि चार दुचाकी
’ठाण्यातील श्रीमंतांची वस्ती असलेल्या पाचपाखाडी भागात दोन फ्लॅट
’शिवाईनगर परिसरात तिसरा फ्लॅट
’पत्नीच्या नावावर इनोव्हा कार तर भावाच्या नावावर फॉच्र्युनर कार
’घरात १६ लाख ३६ हजारांची रोकड
भिवंडीकडे कानाडोळा
भिवंडीतील बेकायदा गोदामांमधून सुरू असलेल्या कारवायांकडे दुर्लक्ष करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागातील काही अधिकाऱ्यांचे हात ओले करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लक्षात आले आहे. त्याचाही तपास सुरू असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crorepati head constable of thane crime branch
First published on: 31-01-2015 at 01:17 IST