जिल्ह्यात मात्र दोन दिवस पुरेल इतकाच लससाठा शिल्लक

ठाणे : राज्य शासनाने रेल्वे प्रवासासाठी करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेणे बंधनकारक केल्यामुळे जिल्ह्य़ातील शासकीय तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची आठवडाभरापासून गर्दी वाढली आहे. जिल्ह्य़ाला गेल्या आठवडय़ात राज्य शासनाकडून १ लाख ८७ हजार ८८० लशीचा साठा मिळाला. यामुळे जिल्ह्य़ातील बऱ्याच दिवसांपासून बंद असलेली लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू झाल्याने लसीकरण मोहिमेला वेग आला. मात्र या साठय़ापैकी सध्या केवळ ३८ हजार लशीचा साठा शिल्लक राहिला असून हा साठा एक ते दोन दिवस पुरेल इतकाच आहे.

रेल्वे प्रवासासाठी लशीच्या दोन मात्रा घेणे बंधनकारक केल्यामुळे मागील आठवडय़ापासून जिल्ह्य़ातील शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठय़ा संख्येने गर्दी होऊ लागली आहे. जिल्ह्य़ात खासगी कंपनीत काम करणारा कर्मचारी, नोकरदार वर्ग मोठा आहे. रेल्वे सेवा बंद असल्यामुळे त्यांना खासगी वाहनाने कार्यालये गाठावी लागत आहेत. यामध्ये त्यांचा अधिकचा वेळ आणि अधिकचे पैसे खर्च होत आहेत. यामुळे लवकरात लवकर करोना प्रतिबंधक लसीकरण करण्यावर हे नागरिक भर देत आहेत. ठाणे जिल्ह्य़ाला पूर्वी राज्य शासनाकडून केवळ ६० ते ७० हजार लशीचा साठा प्राप्त होत होता. हा साठा दोन ते तीन दिवसांत संपत असे, त्यानंतर नवीन साठा येईपर्यंत लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनावर येत होती. मात्र रेल्वे प्रवासाकरिता लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने मागील आठवडय़ात जिल्ह्य़ाला १ लाख ८७ हजार ८८० लशीचा साठा मिळाला. हा साठा मिळताच, जिल्ह्य़ातील बऱ्याच दिवसापासून बंद असलेली लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. मात्र हा साठाही अवघे एक ते दोन दिवस पुरेल इतकाच शिल्लक राहिला असल्याची माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येणार असल्याची चिन्हे आहेत.