ठाणे : मुंब्रा येथील देसाई खाडीत भराव टाकून सुमारे दीड हेक्टर भागातील खारफुटी नष्ट करण्यात आली होती. आठवडय़ाभरापूर्वी कांदळवन कक्षाने येथील अतिक्रमणही हटविल्यानंतर याठिकाणी आता रान भेंडी, करंजवेल अशा खारफुटी सहयोगी वनस्पतीची लागवड करण्याची तयारी सुरु केली आहे.
यासाठी बुधवारी कांदळवन कक्षाच्या कांदळवन प्रतिष्ठानाने याठिकाणी पाहणी करून मातीचे नमुने परिक्षणासाठी घेतले आहेत. या परिक्षण अहवालानंतरच याठिकाणी कोणती वनस्पती लागवड करता येऊ शकते, हे स्पष्ट होणार आहे. तसेच या भागात खारफुटींची पुन्हा वाढ कशी होईल, याचाही अभ्यास कक्षाने सुरू केला आहे.
मुंब्रा येथील चुहा पूल ते दिवा या भागात खाडीमध्ये भराव टाकून रस्ता तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. १५ ते २० फुटांचा हा भराव होता. यामध्ये मोठय़ाप्रमाणात खारफुटींची कत्तल झाली होती. याबाबत पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आवाज उठविला होता. याप्रकरणात दोनजणांविरोधात वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु येथील अतिक्रमण हटविण्यात आले नव्हते. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याची मागणी पर्यावरणवादी संघटनांकडून सुरू होती. आठवडय़ाभरापूर्वीच कांदळवन कक्षाने येथील दीड हेक्टर परिसरातील अतिक्रमण हटविले होते.
याठिकाणी सहयोगी वनस्पतींचे रोपण करण्यात येत आहे. मात्र ज्यांच्याकडून या भागात अतिक्रमण झाले, त्यांच्याकडून याचा खर्च वसूल करण्यात यावा.
– रोहीत जोशी, पर्यावरणवादी कार्यकर्ते.