मराठी भावसंगीताला फार मोठी परंपरा आहे. गजाननराव वाटवे, माणिक वर्मा, सुधीर फडके, अरुण दाते, यशवंत देव, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर आदी गेल्या पिढीतील दिग्गजांनी तसेच आताच्या पिढीतील सुरेश वाडकर, श्रीधर फडके, सलील कुलकर्णी, संदीप खरे अशी अनेक नावे यासंदर्भात सांगता येतील. मात्र ‘जुने ते सोने’ हे कितीही खरे असले तरी परंपरा टिकविण्यासाठी त्यात सातत्याने काहीतरी नावीन्याची भर टाकावी लागते. नव्या प्रतिभेचा शोध घ्यावा लागतो. त्यासाठी उत्तम असे व्यासपीठ निर्माण करावे लागते. आधुनिक टेक्नोसॅव्ही युगात गाणेही डिजिटल झाले आहे. यूटय़ूब तसेच विविध संकेतस्थळांवरून थेट डाउनलोड करून गाणी ऐकणे शक्य झाले आहे. तेव्हा ही आधुनिक पिढी संगीताकडे कशी पाहते? आताच्या पिढीचे भावगीत नेमके कसे आहे, कोणत्या सुरावटी घेऊन ते सादर होते, या साऱ्याचा शोध घेण्यासाठी ठाण्यातील ‘इंद्रधनु’ या संस्थेने जून महिन्यात एक स्पर्धा घोषित केली होती. त्याला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद लाभला. गेल्या रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. त्यानिमित्ताने गडकरी रंगायतनमध्ये जुन्या-नव्या संगीतकारांचे संमेलनच भरले होते.
संगीताला भाषेचे बंधन नसते. याचा प्रत्यक्ष अनुभव या मैफलीमध्ये घेता आला. या वेळी नूपुरा निफाडकर हिने तामिळ भाषेत सादर केलेल्या ‘पिरये’ या गाण्याने भाषेच्या पलीकडे जाऊन सुरांची नव्याने ओळख करून दिली. रसिकांमध्ये बहुतांश महाराष्ट्रीय मंडळी होती. त्यामुळे शब्दांचा अर्थ समजण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र सुरांच्या साथीने शब्दातील भाव मात्र कळत होते.
‘इंद्रधनु’च्या या स्पर्धेत एकूण १४६ जण सहभागी झाले होते. त्यातील १३ जणांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. या सर्वानीच नवी गाणी सादर केली. विनोद बनसोड यांनी ‘लागी कैसी ये तुझसे’ , आदित्य फडके (‘आजा रसिया’,) मंदार आपटे (‘वासुदेवा हृषीकेशा’), गिरीजा मराठे (शाम वनमाळी), अमेय गावंड (टेल मी व्हॉट इज लाइफ), अरुणा अंगळ (पाऊस रेशमी), अजित केतकर (राऊळीच्या दारी) अशी सर्व स्पर्धकांनी स्वत:ची गाणी सादर केली. त्यानंतर प्रत्येकाने ‘गाणे तुझ्यासाठी’ या गाण्याला संगीत दिले होते. प्रत्येक संगीतकार एकाच गाण्याला कशी वेगवेगळी चाल लावतो, त्यातून त्या गाण्याचे कसे वेगवेगळे अर्थ निघतात, हे त्यातून दिसून आले. या वेळी कौशल इनामदार, गुरू ठाकूर, मिलिंद जोशी, मृदुला दाढे-जोशी या मान्यवरांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी गाणं शिकता येतं, पण संगीत देणं शिकविता येत नाही.
तसेच नवीन पिढी बिनधास्त गाते. त्यांची सुरावट, ताल बिघडत नाही. इतकेच नव्हे तर शब्दांची ओढाताण होत नाही, असे मत या वेळी व्यक्त केले. तब्येत बरी नसल्यामुळे यशवंत देव मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी शंकर-जयकिशन यांच्या वाद्यवृंदातील ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत भोसले यांचा सत्कार करण्यात आला. गिरीजा मराठे यांना ‘इंद्रधनु’ प्रथम पारितोषिक तर प्रेक्षक पसंतीचे पारितोषिक देण्यात आले. मंदार आपटे व नूपुरा निफाडकर यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकाविले. सवरेत्कृष्ट गीतकार म्हणून अभिजीत सहस्रबुद्धे यांना गौरविण्यात आले. सवरेत्कृष्ट गायक म्हणून नीलेश निगुडकरची निवड करण्यात आली. गेल्या पाव शतकाहून अधिक काळ सातत्याने दर्जेदार कार्यक्रम करून ‘इंद्रधनु’ संस्थेने ठाण्याच्या सांस्कृतिक श्रीमंतीत भर टाकली आहे. संगीत क्षेत्रातील नव्या प्रतिभेचा शोध घेण्याचा उपक्रम त्यापैकीच एक होता.