नऊ थरांच्या हंडीला राज ठाकरेंची, तर टेंभी नाक्यावर उद्धव यांची हजेरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहीहंडीच्या उंचीवर तसेच गोविंदांच्या सहभागाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आणलेल्या र्निबधांमुळे एकीकडे सर्वसामान्यांत समाधान व्यक्त होत असताना, या मुद्दय़ावर उत्सवाच्या अस्मितेचे राजकारण करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना, मनसे यांसारख्या राजकीय पक्षांनी चालवला आहे. मुंबई, ठाणे महापालिकांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी हे दोन्हीही पक्ष सज्ज झाले आहेत. एकीकडे, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झुगारून ठाण्यात उभारण्यात येणाऱ्या नऊ थरांच्या हंडीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहेत, तर दुसरीकडे, शिवसेनेनेही टेंभी नाका येथे लावण्यात येणाऱ्या दहीहंडीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

ठाणे ते बदलापूपर्यंत ३५० मंडळे दहीहंडी उत्सव साजरा करतात. उंच थराच्या दहीहंडय़ा बांधून काही आयोजकांकडून यापूर्वी लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविण्यात येत असे. मात्र उच्च न्यायालयाच्या र्निबधामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बडय़ा आयोजकांनी या उत्सवातून माघार घेत यानिमित्ताने होणारा धांगडिधगा आवरता घेतला आहे. दरम्यान, हंडी आयोजनासंबंधी आक्रमक भूमिका घेत राज ठाकरे यांनी तुम्ही तयारीला लागा असे आदेश उत्सव मंडळांना देताच ठाण्यातील मनसे नेत्यांनी गुरुवारी यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झुगारून ठाण्यातील मनसेच्या स्थानिक नेत्यांनी मात्र नऊ थरांची दहीहंडी लावण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शहरात फलकही लावले आहेत. या मंडळाने लावलेले फलक उतरविण्याचे आदेश पोलिसांनी बुधवारी आयोजकांना दिले. त्यामुळे काही काळ पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण चित्र तयार झाले होते.

मनसेप्रमुखांची उपस्थितीची चाहूल लागताच शिवसेना खासदार राजन विचारे यांच्यामार्फत जांभळी नाका येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवास उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. उत्सव साजरा करताना सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचे पालन करावे म्हणून ठाणे पोलिसांनी दहीहंडी आयोजकांना नोटिसा धाडल्या आहेत. तसेच उत्सवादरम्यान न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिसांची करडी नजर

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सात पोलीस उपायुक्त, १५ सहायक पोलीस उपायुक्त, ८५ पोलीस निरीक्षक, १७० पोलीस अधिकारी आणि तीन हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या चार तुकडय़ा, ५०० होमगार्ड इतका फौजफाटा बंदोबस्तासाठी नेमण्यात आला आहे. याशिवाय, महिला छेडछाडविरोधी पथक, सोनसाखळी विरोधी पथकही नेमण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी व्हिडीओ शूटिंग करण्यात येणार असून त्याआधारे नियमांचे पालन होते का, याची पाहणी करण्यात येणार आहे.

राज्यमंत्र्यांकडून अडवणूक

ठाणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली परिसरातही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करताना नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी निगडित असलेल्या मंडळाने बाजी प्रभू चौक अडवून तिथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या परिसरात कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेचा बस थांबा असून त्याच्यासमोरच भले मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्यामुळे या भागातून गुरुवारी बस सेवेचे मार्ग बंद होणार असून त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.  कल्याण शिवसेना शाखेने शिवाजी चौकात दहीहंडीसाठी रस्ता अडवला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahi handi issue in thane
First published on: 25-08-2016 at 01:56 IST