करोनाच्या संकटामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. दुपारी चारनंतर दुकानं बंद करण्याचे आदेश आहेत. मात्र, असतानाही ठाण्यात भरवस्तीमध्ये सर्रासपणे डान्सबारमध्ये छमछम सुरू असल्याचं समोर आलं होतं. ही माहिती समोर आल्यानंतर याची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्त जयजित सिंह यांनी दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित केलं आहे. तर दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहर परिसरातील नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत आम्रपाली आणि अँटीक पॅलेस या दोन डान्सबारसह वर्तकनगर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येणारा नटराज डान्सबार निर्बंध असतानाही बिनदिक्कतपणे सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या डान्सबारमध्ये करोना नियमांची पायमल्ली सुरू असल्याचं व्हिडीओत दिसून आलं होतं.

हे प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी प्राथमिक चौकशीच्या आधारावर नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई केली.

याप्रकरणी नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. तर आम्रपाली, अँटीक पॅलेस आणि नटराज या तिन्ही बारचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dance bar sting in thane 2 cops suspended 2 transferred thane dance bars bmh
First published on: 20-07-2021 at 10:25 IST