महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; कमी उंचीमुळे पादचाऱ्यांना अपघात होण्याचे प्रकार
ठाणे शहरातील अनधिकृत फलकांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली लावलेल्या जाहिरात फलकांमुळे पादचाऱ्यांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना समोर येत आहेत. या जाहिरात फलकांमुळे पादचाऱ्यांना दुखापत होण्याचे प्रकार सातत्याने पुढे येत असून वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाणे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात जाहिरातीचा भलामोठा फलक पडल्याची घटना जून महिन्यात घडली होती. यामुळे शहरातील धोकदायक फलकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर ठाणे शहरातील धोकादायक फलकांचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनतर्फे करण्यात आले होते. धोकादायक ठरणारे फलक हटविले जातील असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. प्रत्यक्षात या आघाडीवर अजूनही फारशी हालचाल होत नसताना महापालिकेच्या परवानगीने रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली उभारण्यात आलेल्या फलकांमुळे पादचाऱ्यांना सातत्याने अपघात होत असल्याने फलक उभारणीच्या नियोजनाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील नौपाडा भागात जाणाऱ्या सॅटीस पुलाखाली मोठय़ा प्रमाणात रिक्षांचा राबता असतो. तसेच या भागातील पदपथ हे फेरीवाल्यांनी कायमस्वरूपी गिळंकृत केलेले आहेत.
वागळे औद्योगिक वसाहत, किसनगर आणि लोकमान्यनगर या भागांतून ठाणे स्थानकात मोठय़ा प्रमाणात नागरिक या पुलाखाली रिक्षाने येतात. या ठिकाणी उतरल्यानंतर रिक्षा आणि फेरीवाल्यांमुळे ठाणे स्थानक गाठण्यासाठी पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच सॅटीस पुलाच्या खांबाला कमी उंचीवर लावण्यात आलेले हे जाहिरात फलक त्या ठिकाणाहून तालताना डोकेदुखी ठरत आहे. असे सुमारे ३६ जाहिरात फलक या पुलाखाली लावण्यात आले आहेत. या जाहिरात फलकांमुळे डोक्याला मार लागून दर आठवडय़ात सुमारे तीन ते चार पादचारी जखमी होत असल्याची माहिती परिसरात असणाऱ्या भानुशाली रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे हे फलक लवकरात लवकर या ठिकाणाहून हटवण्यात यावेत अशी मागणी या ठिकाणाहून जाणाऱ्या पादचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या फलकांबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ठाणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
सॅटीस पुलाखाली ३० ते ३५ लोखंडी फलक लावण्यात आले आहेत. या लोखंडी फलकांचे कोपरे त्या ठिकाणाहून जाताना बऱ्याचदा हाताला लागतात. तसेच हे फलक डोक्याला लागण्याचीही भीती आहे. त्यामुळे हे फलक लवकरात लवकर हटवण्यात यावेत. – शरद कांबळे, ठाणे