ठाणे : ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असून डिसेंबर अखेरीस मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे मजबूत करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्यावरील वाहतुक कमी होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाणे महापालिकेच्या वतीने रविवारी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कामाबाबत माहिती दिली. मेट्रो सुरु झाल्यास नागरिक खासगी वाहनांचा वापर कमी करून मेट्रोने प्रवास सुरु करतील. वाहतुकीचा पर्याय उत्तम असेल तर नागरिक त्याचा वापर अधिक करतात. तसेच ठाण्यात देखील अंतर्गत मेट्रोला मंजूरी मिळाली आहे. वडाळा-घाटकोपर-कासारवडवली ही मुख्य मेट्रो मार्गिका ठाण्यात असेल. या मुख्य मेट्रो मार्गिकेला अंतर्गत मेट्रो जोडली जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
ठाण्यात सध्या वडाळा-घाटकोप-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामामुळे घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर येथील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुल गांधींवर आरोप
लोकसभा, तेलंगणा, कर्नाटक जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केला नाही. परंतु विधानसभा हरल्यानंतर त्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली. त्यांना पराभव, जनतेचा कौल पचविता येत नाही. हा आरोप म्हणजे लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकऱ्यांचा, महाराष्ट्रातील तमाम मतदारांचा अपमान आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली
आम्ही एकीकडे विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घातली. त्यामुळे आम्हाला दैदिप्यमान विजय मिळाला. हा विजय त्यांना पचत नाही. त्यांना पोटदुखी झाली आहे. त्यांनी बाहेर आरोप करण्यापेक्षा निवडणूक आयोग, न्यायालयामध्ये जावे. राज्यातील जनता सुज्ञ आहे, मागील अडीच ते तीन वर्षांत केलेली कामे जनतेने पाहिली. त्यामुळे जे घरी बसतात, त्यांना कायमचे घरी बसविण्याचे काम जनतेने केले. २३२ चे संख्याबळ कधीही महाराष्ट्राने पाहिले नव्हते. विरोधी पक्षनेता होण्याइतकेही संख्याबळ आता त्यांच्याकडे नाही. हे कटू सत्य पचविता आले पाहिजे. लोकसभेत आम्ही जनतेचा कौल मान्य केला होता. परंतु ते फक्त आरोप करतात असेही शिंदे म्हणाले.