कल्याण : टिटवाळा परिसरात मोकळ्या पडिक, सरकारी जमिनी, पालिका आरक्षित भूखंडावरील बेकायदा चाळी, जोत्यांवर कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाकडून कारवाई होते म्हणून भूमाफियांनी टिटवाळा बनेली भागातील डोंगर, टेकड्या असलेल्या भागात डोंगर खोदून तेथील वनराई नष्ट करून बेकायदा जोती आणि चाळी उभारणीची कामे सुरू केली होती. अशाप्रकारची ४५ जोती आणि दहाहून अधिक चाळी अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या तोडकाम पथकाने जोती उखडून टाकली आणि चाळी जमीनदोस्त केल्या.

पाऊस सुरू असल्याने बनेली परिसरातील डोंगर, टेकड्या असलेल्या भागात कोणी पालिका अधिकारी फिरकणार नाही. आपण काम करतोय हे अ प्रभागातील कर्मचाऱ्यांना कळणार नाही. असा विचार करून भूमाफियांनी बनेली भागातील डोंगर टेकडी असलेल्या भागात रात्रंदिवस काम करून या भागातील झाडे, टेकडीचा भाग जेसीबीच्या साहाय्याने तोडून तेथे बेकायदा चाळी उभारणीसाठी ४५ जोत्यांची कामे केली होती. उर्वरित भागात बेकायदा चाळींची बांधकामे पूर्ण केली होती. या बेकायदा चाळींमध्ये रहिवास तयार करण्यासाठी भूमाफियांनी चाळीतील खोल्या मिळेल त्या किमतीत विकण्याची तयारी सुरू केली होती. टिटवाळा बनेली भागात डोंगर, टेकड्यांचा धस तोडून भूमाफियांनी ४५ जोती बांधल्याची आणि उर्वरित भागात बेकायदा चाळींची उभारणी केली आहे, अशी माहिती अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना मिळाली.

साहाय्यक आयुक्त पाटील यांनी अधीक्षक, मुकादम यांच्यासह बनेली टेकडी परिसराची पाहणी केली. तेथे बेकायदा चाळी उभारणीसाठी ४५ जोती, काही बेकायदा चाळींची कामे पूर्ण केली असल्याचे आढळले. पालिका अधिकाऱ्यांनी परिसरात ही जोती, चाळी कोणी उभारल्या आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना कोणीही माहिती देण्याचा प्रयत्न केला नाही.टेकडीच्या भागात तोडकाम पथकाची वाहने जाण्यासाठी सुयोग्य रस्ता तयार करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या पाहणीच्या दुसऱ्या दिवशी ४५ जोती आणि नव्याने उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळींची साहाय्यक आयुक्त पाटील यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. खासगी ठेकेदाराचे दहा कामगार या तोडकाम पथकात सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळा सुरू असल्यामुळे अधिकारी पाहणी करून ही बेकायदा बांधकामे तोडणार नाहीत असे भूमाफियांना वाटले होते. पावसाळ्यात ४५ जोत्यांच्या ठिकाणी बेकायदा चाळी उभारणीचे नियोजन माफियांनी केले होते. त्याच्यावर अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी वरंवटा फिरवला. अ प्रभागाकडून गेल्या नऊ महिन्याच्या काळात बनेली, बल्याणी, टिटवाळा परिसरातील शेकडो बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. या भागातील बहुतांशी भूमाफियांची उपजीविका जमिनी हडप करून बेकायदा चाळींवर अवलंबून आहे. त्यामुळे माफिया आपला बेकायदा चाळी उभारणीचा उद्योग सुरू ठेवत असल्याचे समजते. यापूर्वी या माफियांनी तत्कालीन पालिका अधिकारी पाठबळ देत होते. आता टिटवाळा भागात नजरेत दिसली, तक्रार आली की ती बांधकामे तात्काळ भुईसपाट केली जात आहेत.