पालिकेच्या आदेशाला हरताळ; चाचणीसाठी ‘पॅथॉलॉजी लॅब’कडून रुग्णांची लूट

वसई विरार शहरात डेंग्यूच्या रुग्ंणांची वाढ होत असताना दुसरीकडे या आजाराच्या निदानासाठी बंधनकारक असणाऱ्या एलाइजा चाचणी करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅबकडून रुग्णांची लूट सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. महापालिकेने कमी पैशांत ही चाचणी करण्याचे आदेश दिले असतानाही लॅब रुग्णांकडून पैसे उकळत आहेत.

मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीत वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांत डेंग्यूने चार जणांचा बळी घेतला आहे. ही संख्या कमी असली तरी शहराच्या विविध रुग्णालयात डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झालेले अनेक रुग्ण आढळले आहेत, मात्र पालिका केवळ एलाइजा चाचणीत सकारात्मक आढळून आलेल्या रुग्णांचीच डेंग्यू रुग्ण म्हणून नोंद केली जाते. यामुळे शेकडो रुग्णांची नोंदच पालिकेकडे होत नाही. म्हणून पालिकेने वसई-विरारमधील सर्वच रुग्णालयांना आणि दवाखान्यांना ही चाचणी बंधनकारक केली आहे. ही चाचणी पॅथोलोजी लॅब मध्ये करावी लागत असल्याने या लॅबनाही तसे आदेश देण्यात आले आहेत.  पण याच गोष्टीचा फायदा पॅथोलोजी लॅब धारक आता घेत आहेत.

महापालिकेने डेंग्यूसाठी असलेली एलाइजा चाचणी केवळ ६०० रुपयांत करण्याचे आदेश सर्व लॅबधारकांना दिले आहेत. पण महापालिकेचा आदेश धाब्यावर बसवून चालक रुग्णांकडून या चाचणीसाठी तब्बल २ ते ३ हजार रुपये उकळत आहेत. यावर महापालिका कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.

वसई विरार परिसरात नोंदणीकृत ११५ पॅथोलोजी लॅब आणि २५२ रुग्णालये आहेत. या रुग्णालयात दिवसागणिक तीन ते चार रुग्ण हे डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण सापडत आहेत. पण केवळ एलाइजा चाचणी केली नसल्याने. महापालिका अशा रुग्णांची नोंदच करत नाही. एलाइजा चाचणीत महापालिका क्षेत्रात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात १५ रुग्णांची नोंद झाली. तर मागील जानेवारी पासून केवळ ९ रुग्ण डेंग्यूचे असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.

सध्या विरार मधील, मनवेल पाडा, कारगिल नगर, जलबाव वाडी, चंदनसार, जीवदानी पाडा, नालासोपारा येथील मोरेगाव, संतोषभुवन, धानीव, वसई पूर्वेला फादरवाडी, नवजीवन या परीसारार मोठय़ा प्रमाणात डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळत आहेत. त्यांची कोणतीही नोंद पालिकेकडे नाही आहे. यामुळे रुग्णांची संख्या कमी दिसत असल्याने महापालिका प्रबळ उपाय योजना करत नाही आणि पुन्हा लोकांना डेंग्यू मलेरियाचे शिकार व्हावे लागते.

एकीकडे पालिका केवळ एलाइजा चाचणीत सकारात्मक आढळून आलेल्या रुग्णांचीच नोंद करते, तर दुसरीकडे ही चाचणी महागडी असल्याने रुग्ण या चाचणीकडे जात नाहीत. यामुळे केवळ जलद चाचणीच्या आधारावर इलाज केले जातात. पण जलद चाचणी केवळ ६० ते ७० टक्केच सकारात्मक असल्याने अनेक ठिकाणी ही चाचणी फोल ठरू शकते. त्यामुळे रुग्णाला योग्य उपचार देता येत नसल्याचे चैतन्य हॉस्पिटलचे डॉ. अमित सामंत यांनी सांगितले.  अनेकदा रुग्णांना दोन्ही चाचण्या कराव्या लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. त्यातच लॅबकडून एलाइजा चाचणीसाठी दुप्पट पैसे घेतले जातात. ही लूट पालिकेकडून थांबवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

आम्ही महापालिका क्षेत्रातील सर्वच रुग्णालये आणि  पॅथोलोजी लॅब धारकांना एलाइजा चाचणी चाचणी केवळ ६०० रुपयात घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जी रुग्णालये आणि पॅथॉलॉजी लॅब या दराप्रमाणे ही चाचणी करत नसतील त्यांवर आम्ही कारवाई करू.-तबस्सुम काझी, वैद्यकीय अधिकारी पालिका

“मी डेंग्यू ग्रस्त असून मला पॅथोलोजी लॅबमध्ये एलाइजा चाचणी करण्यासाठी सांगितले होते. या चाचणीसाठी माझ्याकडून ३००० हजार रुपये घेण्यात आले.-प्रशांत पाटील, रुग्ण

“मी नालासोपारा येथे एका पॅथोलोजी लॅबमध्ये एलाइजा चाचणी केली तेव्हा माझ्याकडून २२०० रुपये घेण्यात आले. -दिनेश शिंदे, रुग्ण