सात महिन्यांत ४३ हजार जणांकडून १ कोटी ६३ लाखांचा दंड वसूल

ठाणे : करोनाची दुसरी लाट ओसरल्याने र्निबध शिथिल केले असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने राज्य शासनाने करोना नियमावलीचे पालन करणे सक्तीचे केले आहे. तरीही ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरांमधील अनेक नागरिक नियमावलीकडे दुर्लक्ष करीत असून त्यांना मुखपट्टीचा विसर पडू लागल्याची बाब समोर आली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या सात महिन्यांत मुखपट्टीविना फिरणाऱ्या ४३ हजार ४२ नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून १ कोटी ६३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा ठाणे जिल्ह्य़ात शिरकाव झाला. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुखपट्टीचा वापर आणि सामाजिक अंतर नियमांचे पालन करण्याच्या सूचना नागरिकांना केल्या होत्या. सुरुवातीला नागरिकांच्या मनात करोनाविषयी भीती असल्यामुळे त्यांच्याकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसून येत होते. परंतु पहिली लाट ओसरल्यानंतर राज्य शासनाकडून र्निबध शिथिल होताच नागरिकांना करोना नियमाचा विसर पडू लागला. यंदाच्या मार्च महिन्यात दुसरी लाट आल्यानंतर त्यापैकी अनेक नागरिकांनी पुन्हा नियमांचे पालन करण्यास सुरुवात केले. परंतु काही नागरिकांकडून मात्र नियमाची पायमल्ली सुरूच होती. अशा नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत पोलिसांनी कारवाई केली असून, या कारवाईमध्ये मुखपट्टीविना फिरणाऱ्या ४३ हजार ४२ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ६३ लाख ७३ हजार १३२ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

आठ महिन्यांपूर्वी करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरुवातीला अत्यावश्यक सेवा, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर १८ वर्षांपुढील नागरिकांचे असे टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू करण्यात आले. अनेकांनी लशीच्या दोन मात्रा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आपल्याला करोनाची फारशी भीती नाही, असा अनेकांचा समज झाला असून यातूनच अनेकजण करोना नियमावलीचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्याने राज्य शासनाने र्निबध शिथिल केले असून त्याचबरोबर सण-उत्सवांचा काळही सुरू झाला आहे. त्यातच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविली जात आहे. करोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात असतानाही काही लोक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे.