ठाणे : लाडक्या बहिणी या कुटूंब प्रमुख असतात. कुटूंब सांभाळताना त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठीच उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासण्यांमुळे वेळीच आजाराचे निदान होऊन त्यावर उपचार करणे शक्य होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. लाडक्या बहिणींचे आरोग्य चांगले रहावे, यासाठीच हे अभियान राबविण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
ठाणे महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला कॅपीटल फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ ठाण्यातील लोकमान्य नगर भागातील पालिकेच्या कोरस आरोग्य केंद्र येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त संदिप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील, रोटरी क्लबचे डाॅ. कारखानीस यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. या उपक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या अभियानात महिलांच्या गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लस, मधुमेह आणि हिमोग्बोलीनची तपासणी, स्त्रीयांचे निरोगी राहणीमान आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद शिबीर यांचा अंतर्भाव आहे. यासाठी इथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मॅमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबविण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
निरोगी गृहलक्ष्मी हेच खऱ्या अर्थाने परिवाराची खरी संपत्ती
लाडक्या बहिणींचा आरोग्य चांगले राहावे, हे आमच्या सगळ्यांची भावना आहे. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असताना लाडक्या बहिणी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्वत:साठी वेळ काढत नाही. यामुळेच मुख्यमंत्री असताना माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान राबविले होते. यात जवळपास तीन कोटी महिलांची तपासणी करण्यात आली होती आणि त्याचा फायदाही झाला. निदान झाल्यानंतर महिलांना पुढचे उपचार करण्यात आल्याने अनेक महिलांचा आजार बरा झाला. लाडकी बहीण ही कुटूंब प्रमुख असते. तिच्यावर सगळे अवलंबून असते. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू केले आहेत. या शिबिराकडे दुर्लक्ष करू नका, महिलांनी व्यवस्थित माहिती घेतली तर, त्यांचा परिवार अतिशय सुखी समृद्ध होऊ शकतो. कारण निरोगी गृहलक्ष्मी हेच खऱ्या अर्थाने परिवाराची खरी संपत्ती असते, असेही ते म्हणाले.
अत्याधुनिक स्वरुपाची सोनोग्राफी यंत्र
या उपक्रमासाठी एक अत्याधुनिक स्वरुपाची सोनोग्राफी यंत्र घेण्यात आलेले असून आणखी यंत्र खरेदीसाठी नगरविकास विभागाकडून पाच कोटी दिले जातील असे आश्वासनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा फार मोठा आजार मानला जात आहे. त्यामुळे आधी तपासणी केली तर त्यावर उपाय योजना करता येणे शक्य होणार आहे. हा आजार बरा होणार आहे, त्यामुळे यात घाबरण्याची गरज नाही. परंतु त्यासाठी तपासणी महत्वाची असल्याचेही ते म्हणाले. मी मुख्यमंत्री असतांना मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतून ४०० कोटी रुपयांचे वाटप झाले, त्यातून हजारो रुग्णांना त्याचा फायदा झाला. शासन आपल्या दारी उपक्रमातून पाच कोटी नागरीकांना फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर अडीच कोटी महिलांना लाडक्या बहिण योजनेचा लाभ झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.