आधीच्या काळात विजार कमरेवर स्थिर राहावी म्हणून कंबरपट्टा वापरला जायचा. ही झाली जुन्या काळाची कथा. कंबरपट्टा ही संकल्पना इतिहासजमा झाल्यासारखी आहे. हे जरी खरे असले तरी विजार जागेवर राहावी यासाठी वापरला जाणारा पट्टा आता अनेकांसाठी स्टाईल स्टेटमेंट ठरू लागला आहे. विशेषत तरुणींमध्ये वेगवेगळ्या बेल्टच्या फॅशनने जोर धरला असून दिवसागणिक यामध्ये भर पडू लागली आहे.
फॅशन जगतात बदलाला असीम महत्त्व दिले गेले आहे. दररोजच्या पेहरावातील बदल टिपत वेशभूषेच्या नव्या ट्रेण्ड्सना शोभून दिसतील अशा अनेक गोष्टी बाजारात येत असतात. पाश्चिमात्य संस्कृतीला आपलेसे करत पारंपरिक विजारीची जागा आधुनिक आणि वेगवेगळ्या ठेवणीच्या जीन्सने घेतली तेव्हाच हा बदल किती अनुकरणीय आहे याची अनेकांना कल्पना आली असावी. पाश्चिमात्य शैलीच्या ‘लो वेस्ट जीन्स’चे फॅड बाजारात अवतरले तेव्हा खरे तर कंबरपट्टय़ाचे दिवस इतिहासजमा झाल्याचा भास अनेकांना झाला. विजारीवर बेल्ट बांधण्याची प्रथाच संपुष्टात आली की काय, असेही अनेकांना वाटून गेले. मात्र, ‘लो वेस्ट जीन्स’ला शोभून दिसतील अशा बेल्ट्सचा ट्रेण्ड बाजारात अवतरला आणि फॅशन जगतात बदल किती वेगाने घडतात याचा अनुभव अनेकांना आला. गेल्या काही दिवसांत तर बेल्टचे वेगवेगळे प्रकार बाजारात दिसू लागले आहेत. नक्षीकाम करणाऱ्या कारागिरांनी या कंबरपट्टय़ाला एक वेगळे रूप दिले आहे. एक काळ असा होता की ठरावीक पेहरावाला बेल्ट परिधान केला जायचा. गेल्या काही वर्षांपासून साडय़ा, फ्रॉक, मिडी, स्कर्ट्स, इव्हिनिंग गाऊन्सची शोभा वाढविणारे बेल्ट्स बाजारात दिसू लागले आहेत. केवळ चामडय़ाचे बेल्ट वापरण्याचे दिवसही इतिहासजमा झाले आहेत. जॉर्जेट व शिफॉनचे पक्ष्यांच्या पंखांपासून तयार केलेले तसेच साडीवर जरदारीचा, फ्रॉकवर लेसचा आणि मिडीवर मेटलचा बेल्ट बांधण्याची फॅशन सध्या जोरात आहे. तसेच मोती, मणी, पिसं, जरी व हिरे यांनी सजविलेले बेल्ट्सही बाजारात उपलब्ध आहेत. असे आकर्षक बेल्ट्स छोटय़ा दुकानांपासून तर मोठाल्या मॉल्समध्ये पन्नास रुपयांपासून पाचशे रुपयापर्यंत उपलब्ध असतात.
बेल्ट्स हे मुख्यत्वे चामडय़ापासून बनविले जातात. त्याचबरोबर सध्या बाजारात प्लास्टिक, रबर, कापड यापासून तयार केलेले बेल्ट उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे बेल्ट वापरणे हा एक नवा ट्रेण्ड बनला आहे. बाजारात चामडय़ाच्या बेल्टचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये कानपुरी, मद्रास आणि इटालियन हे तीन चामडय़ाचे प्रमुख प्रकार आहेत. सर्वसामान्यपणे जीन्सवर घालण्यासाठी कानपुरी चामडय़ापासून बनविलेले बेल्ट २५० ते ३५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. कार्यालयात जाताना मद्रास लेदरपासून बनविलेले बेल्ट वापरले जातात. या बेल्टची किंमत ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आहे. औपचारिक पेहरावावर खास इटालियन चामडय़ापासून बनविलेले बेल्ट बाजारात उपलब्ध आहेत. ४५० ते ६५० या किमतीत हे बेल्ट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चामडय़ाच्या बेल्टचे हे प्रकार ग्राहकांना माहीत असतीलच असे नाही; पण येणाऱ्या ग्राहकाला बेल्ट नक्की कोणत्या कारणासाठी वापरायचा आहे, त्यानुसार ते प्रकार आम्ही देतो, असे विक्रेते सांगतात. चामडय़ाच्या बेल्टमध्ये जितके वैविध्य आहे तेवढेच अंतर त्याच्या किमतीतही आहे. चामडय़ाच्या बेल्टमध्ये अगदी उत्तम प्रकारच्या चामडय़ाचे बेल्ट हजारांच्या घरातही आहेत.
पुरुषांसाठी..
ऑटो लॉक
ऑटोलॉक बक्कल म्हणजेच कोणत्याही आधाराशिवाय घट्ट बसणारे बक्कल. अशा प्रकारच्या बक्कलना साधरणत: वरील बाजूस एक धातूचा चौकोन असतो. एका विशिष्ट तऱ्हेने पट्टय़ाला अडकविला जातो. अशा प्रकारचे बेल्ट जाड व बारीक दोन्ही आकाराच्या व्यक्ती वापरू शकतात. हल्ली या ऑटो लॉक बक्कलला तरुण मंडळी पसंती देऊ लागले आहेत. या बक्कलचे वैशिष्टय़ म्हणजे एक बक्कल अनेक बेल्ट्स लावता येतो. काही जण एकच बक्कल खरेदी करून वेगवेगळ्या रंगाच्या बेल्ट्सना लावतात.
काटा बक्कल
बक्कलच्या या प्रकाराला पारंपरिक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा प्रकारचे बक्कल असलेले बेल्ट आजही असंख्य लोक आवडीने किंवा सवयीने वापरतात. या बक्कलचे वैशिष्टय़ म्हणजे हे अत्यंत आरामदायी असून सर्व प्रकारच्या पेहरावांवर शोभून दिसतात.
एकात दोन
एकच बेल्ट- एकच बक्कल परंतु दोन प्रकारे वापरता येतील असे (रिव्हर्सेबल) बेल्ट सध्या बाजारात सगळ्यांची पसंती मिळवत आहेत. या बेल्ट्समध्ये पुढे-मागे दोन वेगवेगळ्या रंगांचा वापर केलेला असतो. त्यावरील बक्कल हवा तसा फिरवता येतो. त्यामुळे हे बक्कल एकाच किमतीमध्ये दोन बेल्ट्सचे काम करते. त्यासाठी हे बक्कल वापरले जाते. तैवान आणि चायना हे दोनच ब्रॅंड बक्कलमध्ये आहेत. चायनाचे हे बेल्ट ६० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
स्त्रियांसाठी औपचारिक पेहरावासाठी
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यालयाची पायरी चढताना स्त्रियांच्या पेहरावातही साम्य दिसून येते. पॅण्ट-शर्ट घालणाऱ्या स्त्रियांसाठी बाजारात असंख्य बेल्ट्सचे प्रकार उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे पुरुषांसारखे काटा बक्कल, ऑटो लॉक, आदी प्रकारांसोबत वैविध्यपूर्ण असे रंगीबेरंगी बेल्ट्स बाजारात पाहायला मिळतात.
प्रासंगिक पेहरावासाठी..
फिरायला जाताना किंवा समारंभाना जाताना तरुणी पॅण्ट, स्कर्ट, मिडी, वनपीस आदी प्रकारचे कपडे परिधान करतात. त्यावर मोठय़ा आकाराचे किंवा अगदीच लहान आकाराचे असे विविध नक्षींचे बेल्ट्स तरुणींना सध्या भुरळ घालत आहेत. पॅण्टसाठी चामडय़ाचे बेल्ट व स्कर्टवर घालण्यासाठी धातूच्या खडय़ांचे बेल्ट बाजारात उपलब्ध आहेत. तसेच वनपीस किंवा मिडीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेल्ट्सना मोती, हिरे, फुलपाखरांच्या नक्षीचे बेल्ट्स तरुणींच्या पसंतीस उतरत आहे.
साडीसाठी..
बेल्ट म्हटले की केवळ पॅण्ट डोळ्यासमोर येते. परंतु या फॅशनच्या युगात साडीवर घालण्यासाठी विविध आकाराचे रंगाचे धातूचे पट्टे बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये केवळ मोत्याचे, सोनेरी, चंदेरी आदी रंगांचे पट्टे बाजारात उपलब्ध आहेत.
बेल्ट सर्वसामान्य असला तरी त्याच्या बक्कलमध्ये वैविधता आढळून येते. काटा बक्कल किंवा ऑटो लॉक असे काही प्रकार सध्या पुरुषांसाठी उपलब्ध आहेत. याउलट तरुणींमध्ये बेल्ट आणि बक्कल या दोन्हींमध्ये भन्नाट प्रकार पाहायला मिळतात. बेल्टचे मटेरिअल काय आहे, यापेक्षा त्यावर बक्कल कोणते आहे त्यावरच बेल्टची खरी ओळख असते. हे बक्कल पाहिजे त्या आकारात हव्या त्या स्टाईलमध्ये उपलब्ध आहेत.