अंबरनाथः अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात सुर्योदय सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू आहे. अनेक इमारतींचे पुनर्निमाण होत असताना यासाठी लागणारे बांधकाम साहित्य थेट रस्त्यांवर टाकून नागरिकांचे वाहतुकीचे रस्ते अडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे.
पुनर्विकास नागरिकांच्या रहदारीवर परिणाम करत असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होते आहे.अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात मोठ्या क्षेत्रावर सुर्योदय सोसायची पसरलेली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी म्हणून या सोसायटीला ओळखले जाते. वर्ग दोनच्या जमिनींना वर्ग एकमध्ये रूपांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने या परिसरात पुनर्विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींची पुनर्बांधणी सुरू आहे. यातील अनेक इमारती पूर्णही झाल्या आहेत. मात्र हा पुनर्विकास इतर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.
अंबरनाथ पूर्वेच्या या सुर्योदय सोसायटीत पुनर्विकास करत असताना अनेक बांधकाम व्यावसायिक थेट रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकत असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ सिटीझन फोरमच्या सदस्यांनी ही बाब उघडकीस आणली आहे. सुर्योदय सोसायटीतील कानसई परिसरातील भूखंड क्रमांक ३८० येथील चौकातच एका बांधकाम व्यावसायिकाने थेट रस्त्यावर खडी टाकली आहे. रस्त्याचा सुमारे ९० टक्के भाग या खडीने व्यापल्याचे दिसते आहे. त्यातच पदपथ आधीच बांधकामासाठी लागणाऱ्या यंत्र, सिमेंटच्या गोण्या तसेच सळयांनी व्यापला आहे. त्यामुळे येथून पायी जाणेही कठीण झाले आहे. विशेष म्हणजे कानसई भागातून हुतात्मा चौकात जाण्यासाठी आणि येण्यासाठी हा चौक महत्वाचा आहे. यातच रस्ता व्यापला गेल्याने वाहन चालकांत आणि स्थानिक नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
या परिसरात विविध ठिकाणी पुनर्विकासात जुन्या इमारती तोडल्या जात असतात. या तोडत असताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर धुळ, सिमेंटचे तुकडे उडतात. रस्त्यावर आठवडाभर तोडकामाचे साहित्य, त्यासाठी लागणारी यंत्रे ठेवून रस्ते अडवले जातात. त्यानंतर बांधकामाचे साहित्य, त्यात सळई, तारा, खिळे, लाकडे अशा सर्व साहित्याचे तुकडे भुखंडाशेजारीच पडलेले असतात. त्यामुळे वाहनांचे टायर फुटने, इजा होण्यासारखे प्रकार होत असतात. त्यामुळे अरूंद रस्त्यावरील भुखंड पुनर्विकासाच्या कामात बांधकाम व्यावसायिकांना शिस्त लावण्याची मागणी होते आहे.
शालेय विद्यार्थ्यांनाही फटका
अंबरनाथच्या कानसई परिसरात भगिनी मंडळ ही शाळा आहे. या शाळेच्या चारही बाजूंना सध्या इमारतींची उभारणी सुरू आहे. बांधकाम साहित्य, सळई, यंत्रे रस्त्यावर उभ्या राहत असल्याने त्या सिमेंट, रेतीच्या गर्दीतून विद्यार्थी आणि पालकांना मार्ग काढावा लागतो आहे. यात तक्रार करण्याची कसलीही सोय नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना आशिर्वाद कुणाचा असा प्रश्न उपस्थित होतो आहे.