मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला टोला; ‘मुद्रा’च्या लाभार्थ्यांना कर्जवाटप
केवळ घोषणा देऊन गरिबी हटत नाही. त्यासाठी सामान्य नागरिकांच्या हातात आर्थिक अधिकार द्यावे लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या दोन वर्षांत जनधन योजना आणि मुद्रा योजनेद्वारे नागरिकांना आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यामुळे खऱ्या आता अर्थाने गरिबी हटवण्यास सुरुवात झाली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. अश्वमेध प्रतिष्ठान आणि ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे प्रधानमंत्री मुद्रा योजनाचा लाभ घेतलेल्यांना कर्जवाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत खुल्या रंगमंचावर झालेल्या या कार्यक्रमामध्ये मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या ४,६०० जणांपैकी दहा जणांना प्रात्यनिधिक स्वरूपात कर्जवाटप करण्यात आले.
मुद्रा कर्जवितरणात महाराष्ट्र प्रथम
आजपर्यंत केवळ मोठय़ा प्रकल्पांना, उद्योगांना बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देत होत्या. मात्र, आता मुद्रा योजनेमुळे अगदी घरी व्यवसाय करणाऱ्या तसेच लघु, मध्यम आणि कुटिरोद्योग करणाऱ्यांनाही कर्ज मिळून त्यांची आर्थिक प्रगती होणे शक्य झाले आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना कर्ज मिळत असून कर्ज वितरणात महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.