राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन सुरु असणाऱ्या वादावर प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाब्दिक चिमटा काढला आहे. शरद पवार यांनी स्वत: काँग्रेसमधून बाहेर पडल्याचा संदर्भ देत सध्याच्या वादावर भाष्य केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी फडणवीस यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी शरद पवारांना टोला लगावला.

नक्की पाहा >> Photos: …तर शिंदे गटात बंडाची शक्यता; मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या ‘त्या’ बैठकीत पाच आमदारांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी

पवार काय म्हणाले होते?
पवार यांनी शिवसेनेचं निवडणूक चिन्हं असणाऱ्या धनुष्यबाणासाठी सुरु असणाऱ्या कायदेशीर संघर्षाबाबत बुधवारी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना महत्वाचं विधान केलं. बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर ते वेगळा पक्ष काढू शकतात आणि वेगळं चिन्ह ठरवू शकतात. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असं विधान त्यांनी केलं. सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारलं असता, पवार यांनी, “धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्या विचारांपासून स्वीकारलेलं हे चिन्ह आहे. त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह काढून घेणं आणि त्यातून वाद-विवाद निर्माण करणं योग्य नाही. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर, ते जरूर स्वत:चा पक्ष काढू शकतात आणि स्वत: वेगळं चिन्ह ठरवू शकतात,” असं म्हटलं होतं.

नक्की वाचा >> ४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान

“माझेही काँग्रेससोबत मतभेद झाले होते. त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा वेगळा पक्ष काढला आणि वेगळं चिन्ह ‘घड्याळ’ घेतलं. आम्ही त्यांचं चिन्ह मागितलं नाही किंवा वाद वाढवला नाही. पण जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं त्यांना पाठिंबा देणार नाहीत,” असं विधान शरद पवार यांनी केलं.

नक्की वाचा >> ‘भाजपा मित्रपक्ष संपवायचं काम करते’ या टीकेवरुन फडणवीसांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “पवार साहेबांचं दु:ख…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस यावर काय म्हणाले?
पवारांच्या याच विधानावरुन फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. “मी ज्या वेळेस काँग्रेस सोडली तेव्हा पक्ष पण बदलला आणि चिन्ह पण बदललं. शिवसेनेच्या चिन्हावरुन वाद का सुरु आहे असं पवार म्हणालेत,” असा संदर्भ देत फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “त्यांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते. डिफेक्शनचे कायदे कुठे होते तेव्हा? कोणालाही कसंही बनवता यायचं. आज कायदे तयार झालेले आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाई करावी लागते. ती कायदेशीर लढाई शिवसेना, शिंदे साहेब करत आहेत,” असं उत्तर दिलं.