मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी डोंबिवली येथील प्रचारसभेत शिवसेनेच्या गुंडगिरीच्या संस्कृतीवर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक हरणार असे दिसायला लागल्यामुळे शिवसेनेकडून भाजपच्या उमेदवारांवर हल्ले करण्यात आहेत. ही कुठली संस्कृती आहे?, आमच्याच कार्यकर्त्यांना मारायचं आणि आम्हालाचं दहशतवादी ठरवायचं, असे उद्योग शिवसेनेच्या नाटक कंपनीकडून सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी हातात बांगड्या भरल्या नाहीत. केवळ शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून भाजप कार्यकर्ते संयम बाळगून असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुका जवळ आल्यानंतरच शिवसेनेला पाकिस्तानविरोध आठवतो. आम्हाला राष्ट्रवाद शिकविणाऱ्या सेनेला मातोश्रीवर जावेद मियाँदादला जेवायला बोलावलेले कसे काय चालते, असा सवाल फडणवीस यांनी विचारला. वाघाच्या पंजाची भीती काँग्रेस-राष्ट्रवादीला दाखवा, आम्हाला घाबरवू नका, असा टोलाही त्यांनी यावेळी सेनेला लगावला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनादेखील लक्ष्य केले. राज्य सरकार आणि पाटबंधारे खात्यातर्फे करण्यात आलेली कामे स्वत:ची म्हणवून जनतेची दिशाभूल करू नका. तुम्ही खरचं नाशिक बदललं असतं तर विधानसभा निवडणुकीत तुमचा एकही आमदार का निवडून आला नाही, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis take a dig at shiv sena in kalyan dombivali election rally
First published on: 30-10-2015 at 17:31 IST