ठाणे : ठाण्यातील २० वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठावर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून सोमवारी स्वामी समर्थ भक्तांनी थेट महापालिका मुख्यालयात प्रवेश करुन ठाणे महापालिके विरोधात घोषणाबाजी केली. तसेच स्वामी समर्थांची आरती गायली. काहींनी महापालिकेत खाली बसून ठिय्या मांडला. त्यामुळे महापालिकेत एकच गोंधळ निर्माण झाला होता.

घोडबंदर येथील आनंदनगर भागात स्वामी समर्थांचे २० वर्ष जुने मठ आहे. हे मठ म्हाडाच्या जागेत असून अनेक वर्षांपासून या जागेवरून वाद सुरु आहे. हजारो नागरिक येथे दर्शानासाठी येत असतात. येथे बालसंस्कार तसेच इतर उत्सव देखील मोठ्याप्रमाणात साजरे होतात. येथे उद्यान उभारले जाणार असल्याने येथील मठावर कारवाई करण्यास ठाणे महापालिकेने सुरुवात केली आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) मनोज प्रधान, शिवसेना (ठाकरे गट) प्रदीप पुर्णेकर यांच्यासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. ही कारवाई करताना देखील महापालिकेविरोधात येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

सोमवारी मोठ्याप्रमाणात स्वामी समर्थ यांचे भक्त एकत्र आले होते. त्यांच्यासोबत मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह इतर पक्षाचे कार्यकर्तेही होते.

या सर्वांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश केला. महिलांचे प्रमाण यामध्ये अधिक होते.

महापालिका मुख्यालयात आरती

महापालिका मुख्यालयात प्रवेश करताच, महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी तैनात झाले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कडे निर्माण करण्यात आले. अखेर आंदोलकांनी स्वामी समर्थांच्या नावाने आरती गाण्यास सुरु केली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.