बदलापुरात परंपरागत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आता बदलापूरची युवा पिढी जोशात व संपूर्ण ताकदीनिशी उभी राहात असून आगामी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी या युवा पिढीच्या जोशाची एक झलक नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनी बदलापूरवासीयांपुढे आलेली आहे. अंकित जाधव व अनिकेत जाधव या दोन सख्ख्या भावंडांनी आपली पदरमोड करीत मरतड नावाचे ढोलपथक बदलापुरात उभे केले. बदलापुरातले हे दुसरे ढोलपथक असून यापूर्वी गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागतयात्रेसाठी कुळगावातील हनुमान मारुती देवस्थानने गर्जा या ढोलपथकाची निर्मिती केली होती.
या वर्षीच्या मे महिन्यापासून अंकित व अनिकेत यांनी ढोल-ताशापथक स्थापन करण्यासाठी मेहनत घेतली आहे. यासाठी त्या दोघांनी स्वत:चे पैसे खर्चून ढोल-ताशा आदी साहित्य विकत घेतले आहे. यासाठी त्यांनी खास पुण्याच्या बाळासाहेब केंदूरकर यांच्याकडून ढोल व ताशे मागविले आहेत. १६ ढोल, ५ ताशे, १ ध्वज व १ शंख आणि १ टोल आदी साहित्य त्यांनी घेतले असून तोंडी प्रचारावरच त्यांचे साथीदार बदलापुरातून जमा झाले. १५०० रुपये घेऊन आजीव सभासद झालेल्या तरुणांचा समावेश पथकात असून या पथकात १९ तरुण व ११ तरुणी आहेत. पांढरा झब्बा-कुडता आणि केशरी शेला परिधान करून त्यांनी १५ ऑगस्टला झालेल्या वर्षां मॅरेथॉनमध्ये प्रथमच ढोल-ताशांचे उत्कृष्ट सादरीकरण केले आहे. इथून पुढेही नवरात्र, दसरा, नववर्ष स्वागतयात्रा आदी सणांना आम्ही ढोल-ताशापथकाचे वादन करणार आहोत, अशी माहिती अंकित जाधवने दिली.
ठाण्याच्या ‘रौद्रशंभू’ पथकाकडून प्रशिक्षण
गेल्या वर्षी बदलापुरात नवरात्र उत्सवात ठाण्यातून आलेल्या रौद्रशंभू पथकाचे वादन बघून अंकित व अनिकेत यांनी प्रेरणा घेऊन स्वत:चे ढोलपथक काढण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी ठाण्याला जाऊन रौद्रशंभू पथकात प्रवेश घेत आठ महिने प्रशिक्षण घेतले. रौद्रशंभूकडून ढोल बांधण्यापासून वाजवण्यापर्यंत आणि त्यांची देखभाल-दुरुस्ती आदी माहिती त्यांनी घेतली.
बदलापुरात गणेशोत्सवाची लगबग सुरू
अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग आता बदलापुरात दिसू लागली आहे. यंदाच्या वर्षी रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाने पर्यावरणपूरक अशा शाडूच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेतली आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी अशी कार्यशाळा भरवली जाते. तर आंबवणे बंधू यांच्या गणेश चित्रकला मंदिरातील मूर्तीनी जर्मनी, इंडोनेशिया, मॉरिशस अशी उड्डाणे घेत परदेशात पुन्हा एकदा आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाने आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक गणपतींच्या मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. या वेळी वय वर्षे ८ ते ६० दरम्यान असलेल्या बहुतेकांनी या कार्यशाळेत भाग घेतला. एकूण ३३ प्रशिक्षणार्थी यात सहभागी झाले होते. गेली आठ वर्षे हा कार्यक्रम रोटरी क्लबकडून राबवला जात असून पर्यावरण जागृती हा या कार्यशाळेमागचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला चुरी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhol tasha pathak martad performing in ganesh festival
First published on: 20-08-2015 at 01:40 IST