colleageडॉ. व्ही. एन. बेडेकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातर्फे शुक्रवार, ३० आणि शनिवार, ३१ जानेवारी दरम्यान ‘दिग्वलय’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षीचा हा महोत्सव ‘इनक्रेडिबल इंडिया’ या विषयावर आधारित आहे. या महोत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या या महोत्सवात बाजारमूल्यांशी निगडित ‘शेअर-ए-बझार’ तर व्यवसाय तंत्राशी संलग्न असलेला ‘व्यापारनीती’, कल्पकतेस वाव देणारा जाहिरातविषयक ‘विज्ञापन-ओ-पंती’, विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीला चालना देणारा ‘व्यापार ज्ञान’, भारतातील विविध भागांतील विपणन व्यवस्थापनाची वेगळेपण सांगणारा ‘भ्रमंती’, तसेच संघटन आणि समन्वयाची सांगड घालायला लावणारा ‘जननीती’ अशा विविध स्पर्धा या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वत:साठी भरवलेली ‘आंतराष्ट्रीय परिषद’ त्याचप्रमाणे व्यवसाय व्यस्थापनामध्ये आपली सामाजिक कर्तव्ये विद्यार्थ्यांना कळावीत याकरिता ‘कर्तव्य’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाच्या मार्गावरील अडथळ्यांना समर्थपणे तोंड देता यावे, याकरिता ‘चक्रव्यूह’ ही उत्कृष्ट स्पर्धा घेण्यात येणार आहे.