डोंबिवली – खोणी तळोजा रस्त्यावरील पलावा विभागातील लोढा क्राऊन ऑर्चिड सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवारी होती. या निवडणुकीत दोन गट उभे होते. लोढा क्राऊन सोसायटीतील एका दिव्यांग महिलेने एका गटातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. दिव्यांग महिलेने ग्रामस्थांचा दबाव येऊनही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. या वादातून खोणीतील चार जणांनी दिव्यांग महिलेविषयी अश्लिल शेरेबाजी करत दिव्यांग महिलेसह तिच्या पतीला विरुद्ध पक्षातील गटाने मारहाण केली.

मानपाडा पोलीस ठाण्यात या दिव्यांग महिलेने तक्रार केली आहे. ही महिला नोकरी करते. या महिलेचे पती सनदी लेखापाल आहेत. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी खोणी गावातील सर्वेश पावसकर, महेश ठोंबरे, अल्पेश सैंदाणे, वेदप्रकाश तिवारी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, लोढा क्राऊन ऑर्चिड सोसायटीची रविवारी कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होती. या निवडणुकीत विश्वास गट आणि महेश ठोंबरे यांचे विकास पॅनेल असे दोन गट परस्पर विरोधी उभे होते. या निवडणुकीसाठी तक्रारदार दिव्यांग महिलेने विश्वास गटातून उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज दिव्यांग महिलेने मागे घ्यावा म्हणून विकास पॅनेलचे महेश ठोंबरे प्रयत्न करू लागले. ही महिला उमेदवारी अर्ज मागे घेत नाही म्हणून त्यांच्याकडे पाहून विकास गटाचे सदस्य शेरेबाजी करत होते. ही महिला स्वता उभी राहून शकत नाही, ती सोसायटी काय चालविणार, असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता.

मतदानाच्या दिवशी दिव्यांग महिला मतमोजणीच्या ठिकाणी आपल्या वाहनातून जात होती. त्यावेळी विरुध्द गटातील महेश ठोंबरे आणि इतर एका वाहनातून बाजुने जात होते. त्यावेळी त्यांनी तक्रारदार महिलेकडे पाहून अश्लिल शेरेबाजी केली. हा प्रकार महिलेने आपल्या पतीला सांगितला. त्यावेळी पतीने अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या सर्वेश पावसकर यांना जाब विचारला. यावेळी झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.

विकास गटाच्या सदस्यांनी दिव्यांग महिलेच्या पतीला मारहाण केली. पतीला सोडविण्यासाठी दिव्यांग महिला, विश्वास गटाचे कार्यकर्ते साक्षी सावंत, मनोजकुमार पांडे, नीलेश महाडिक, दीपक आव्हाड पुढे आले. त्यावेळी त्यांनाही विकास गटाच्या सदस्यांनी मारहाण केली. तसेच, दिव्यांग महिला आणि तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. या मारहाण आणि धमकी प्रकरणी दिव्यांग डाॅक्टर महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.