बदलापूरः केंद्रीय पंचायरराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. एकीकडे मुरबाड रेल्वेसाठी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल  पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करत असताना आमदार किसन कथोरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत होते. तर बारवी धरणग्रस्तांच्या प्रश्नावर कथोरे एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे मागणी करत होते तर दुसरीकडे मंत्री कपिल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेताना दिसले. त्यामुळे सामायीक प्रश्नांवरही एकाच पक्षाच्या लोकप्रतिनिधीमध्ये समन्वय नसल्याचेच चित्र दिसून आले.  तर एकाच प्रश्नावर दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचे चित्र दिसले.

नक्की वाचा >>Maharashtra News Live : बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री झालो- एकनाथ शिंदे

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप नेत्यांमध्येही नवा उत्साह संचारला आहे. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे जिल्ह्यातील भाजपचे दोन ज्येष्ठे नेते आहेत. मुरबाड तालुक्यातील महत्वाच्या प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही लोकप्रतिनिधी सक्रीय दिसत आहेत. दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्यात जणू स्पर्धा लागल्याचे चित्र सध्या दिसते आहे. सोमवारी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचा प्रश्न मांडला होता. केंद्र आणि राज्याच्या सहभागातून होणाऱ्या  या मार्गासाठी ५० टक्के निधीची हमी देण्याचे पत्र देण्याची मागणी कपिल पाटील यांनी केली होती. तर दुसऱ्याच दिवशी आमदार कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत याबाबतची मागणी केली. तसेच काही दिवसांपूर्वी बारवी धरणग्रस्तांना नोकरी देण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कथोरे यांनी केली होती. तर मंगळवारी  मंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय यंत्रणांची बैठक घेत यावर २२ जुलै रोजी नोकऱ्यांसाठी सोडत काढण्याचा तोडगा काढला. त्यामुळे सामायिक विषयांवर दोन्ही लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळ्या पद्धतीने स्वतंत्रपणे पाठपुरावा सुरू असल्याने या दोन लोकप्रतिनिधींमध्ये एकवाक्यता नाही का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच दोन्ही नेते आपणच कसे प्रश्न मार्गी लावतो आहे याचा दावा करत समाजमाध्यम आणि माध्यमांच्या प्रतिनिधींकडे माहिती देत असल्याने श्रेयवादाची जणू स्पर्धाच या दोघांमध्ये रंगली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीपासून वादाला सुरूवात

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपासून या दोन्ही भाजप नेत्यांमध्ये संघर्षाला सुरूवात झाल्याचे बोलले जाते. शहापूर आणि मुरबाड नगर पंचायत निवडणुकीत हा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अप्रत्यक्ष टिकाही केली. शहापुरातील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आले असतानाही कपिल पाटील आयोजक असल्याने कथोरेंनी या कार्यक्रमात जाणे टाळले होते. तर मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत स्वतःचे उमेदवार देणाऱ्या कपिल पाटील यांना कथोरे यांनीच धुळ चारली होती. त्या ठिकाणी अपक्ष निवडून आले होते.