ठाणे – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आता कात टाकत असून स्मार्ट आरोग्य केंद्र उभी राहत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून काम सुरु असून पाहिल्या टप्य्यात पाच आरोग्य केंद्रांचे स्मार्ट आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. यामध्ये बाह्यरुग्ण विभाग, औषध वितरण विभाग, लसीकरण विभाग, स्तनपान कक्ष, निरीक्षण कक्ष, स्त्रीरोग विभाग, अत्याधुनिक उपकरणे, टोकन पद्धती, अत्याधूनिक शस्त्रक्रिया विभाग, इंटरनेट यांसह विविध बाबींचा या स्मार्ट आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उर्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे देखील जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. यानुसार इतर केंद्रांचे काम देखील सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हीच आरोग्यसेवेची पहिली पायरी मानली जाते. गावागावात प्राथमिक उपचार, लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी, तसेच बालसंगोपन यांसारख्या अत्यावश्यक सेवांचा पुरवठा हीच केंद्रे करतात. त्यामुळे या केंद्रांचे आधुनिकीकरण म्हणजे केवळ इमारतींचा बदल नव्हे, तर संपूर्ण आरोग्यसेवेच्या गुणवत्तेतील आमूलाग्र सुधारणा ठरते. आजही अनेक गावांमध्ये योग्य आरोग्य सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थनांकडून मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

काही ठिकाणी मात्र आजही तशीच परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक सक्षम बनविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रांचे काम पूर्ण झाल्यानंतर आता उर्वरित केंद्रांवरही जलदगतीने काम सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या कामावर काटेकोर देखरेख ठेवली असून, सर्व केंद्रे आगामी काही महिन्यांत नागरिकांसाठी कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे. स्मार्ट आरोग्य केंद्रांमुळे जिल्ह्याचा आरोग्यविषयक दर्जा उंचावणार असून, ग्रामीण जनतेला शहरातील रुग्णालयांइतक्याच दर्जेदार सुविधा आपल्या गावात मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या

शहापूर – ९

भिवंडी – ८

मुरबाड – ९

अंबरनाथ – ४

कल्याण – ३

पाच आरोग्य केंद्र झाली स्मार्ट

भिवंडी मधील वज्रेश्वरी, खारबाव, मुरबाड मधील धसई, अंबरनाथ मधील सोनावळा, शहापुर मधील शेणवा या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. याअंतर्गत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ आणि सुसज्ज वातावरण, तसेच डिजिटल पद्धतींचा लाभ मिळू लागला आहे. स्मार्ट आरोग्य केंद्रांमध्ये आता सेमी-मॉड्युलर प्रयोगशाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, रुग्णवाहिका, स्वयंचलित नोंदणी प्रणाली, टोकन पद्धती, औषध वितरण यंत्रणा, डिजिटल रुग्ण नोंदवही, तसेच ऑनलाइन रिपोर्टिंग प्रणाली यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.

तपासणी आणि उपचार प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान झाली आहे. स्त्रीरोग विभागात सुरक्षित प्रसूतीसाठी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली असून, स्तनपान कक्ष आणि निरीक्षण कक्ष यामुळे महिलांसाठी अधिक सोयीस्कर वातावरण तयार झाले आहे. याशिवाय लसीकरण विभाग, दंतचिकित्सा आणि नेत्र तपासणीसाठी स्वतंत्र विभाग, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष यांचा समावेशही करण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने सरकारी आरोग्य योजना, नोंदणी, रिपोर्टिंग, औषध मागणी आणि तपासणी अहवाल या सर्व प्रक्रिया आता डिजिटल माध्यमातून पार पडत आहेत. त्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता दोन्ही वाढल्या आहेत.