शासकीय आणि खाजगी कार्यालय तंबाखूमुक्त करण्यासाठी जनजागृती मोहीम
ठाणे – जिल्हा प्रशासनातर्फे मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याचेच फलित म्हणून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील ८१९ शाळा या तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी कार्यालयेही तंबाखूमुक्त कसे होतील यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती मोहीम आखणीचे काम सुरु करण्यात आले आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा प्रशासन आणि सलाम मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्तविद्यमाने जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळेच्या शंभर यार्डच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांबाबत पोलिसांना तक्रार करणे, विद्यार्थी, शिक्षक, सुरक्षा रक्षक, शिपाई यांपैकी कोणीही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तर करत नाही ना, याकडे लक्ष ठेवणे यांसारखी कामे या समितीद्वारे केली जातात. तसेच शाळेत हे पदार्थ सेवन करताना आढळले तर त्यांचे जिल्हा प्रशासनामार्फत समुपदेशन करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी तंबाखू आणि त्याचे दुष्परिणाम या विषयाला अनुसरून भित्तीचित्र, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येते. शाळेला तंबाखूमुक्त घोषित करण्यासाठी शाळेच्या आवारात तंबाखू विक्री करणारी दुकाने नसणे, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यापैकी कोणीही तंबाखूचे सेवन करत नसणे, यासाठी समितीची स्थापना करणे यांसारखे काही निकष ठेवण्यात आले आहेत. या मोहिमेत सहभागी असणाऱ्या सलाम मुंबई संस्थेतर्फे एका ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये ज्या शाळांनी सर्व निकष पूर्ण केले आहेत, त्यांच्याद्वारे नोंदणी केली जाते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि संस्थेचे स्वयंसेवक शाळेला भेट देऊन तपासणी करून शाळेला तंबाखूमुक्त घोषित करून शाळेबाहेर तंबाखूमुक्त शाळा असा फलक लावण्यात येतो. अशा पद्धतीने आता पर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ८१९ शाळा तंबाखूमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
कार्यालये तंबाखूमुक्त करण्याच्या सूचना
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील शाळांमध्ये ज्या पद्धतीने तंबाखूच्या दुष्परिणामणाबाबत जनजगृती केली जात आहे, त्याच पद्धतीने खाजगी, शासकीय कार्यालयांमध्ये देखील ही मोहीम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना तंबाखूमुळे होणारे आजारांबाबत माहिती देणे, आरोग्य तपासणी शिबीर राबविणे, कार्यालयांमध्ये धूम्रपान निषिद्ध कक्ष निर्माण करणे, तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांचे समुपदेशन करणे यांसारखे उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


जिल्हा प्रशासनातर्फे शाळा तसेच खाजगी, सरकारी आस्थापना तंबाखू मुक्त व्हाव्यात याकरिता जनजागृती मोहीम राबविली जात आहेत. आजतागयत जिल्ह्यातील अनेक शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. येत्या काळात जिल्हा प्रशासनातर्फे तंबाखू मुक्ती साठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.– डॉ. अर्चना पवार, जिल्हा दंतशल्यचिकित्सक, ठाणे</strong>

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District tobacco free schools public awareness campaign tobacco public private offices amy
First published on: 11-05-2022 at 16:05 IST