ठाणे : दिवा येथील साबेगाव भागातील तळ अधिक दुमजली धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या घटनेनंतर येथील सदनिकांमध्ये ३० व्यक्ती अडकले होते. त्यांची सुटका करण्यास ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले.

साबेगाव येथील दिवा मैदान परिसरात सावळाराम स्मृती चाळ ही दुमजली इमारत आहे. ही इमारत सुमारे २० ते २० वर्ष जुनी असून २१ सदनिका या इमारतीत आहेत. शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास येथील पहिल्या मजल्याच्या सज्जाचा भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीमधील काही सदनिकांमध्ये एकूण ३० जण अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले.

या घटनेनंतर सर्व सदनिका बंद करण्यात आल्या असून सुरक्षेच्यादृष्टिने आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारत परिसरात धोकापट्टी बांधली आहे. तसेच येथील रहिवासी त्यांच्या नातेवाईंकाकडे राहण्यास गेल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली.