|| मोहन गद्रे
काळाबरोबर राहणीमान आणि आचारविचारसंबंधीचे सर्वच संदर्भ बदलत जाणार आहेत हे वास्तव स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, परंतु संवेदनशील मन मात्र कायम टिकले पाहिजे, टिकवले पाहिजे. आपल्या देशाच्या थोर परंपरेमुळे त्याची खात्री आपल्याला देता येईल, त्याचा आविष्कार वेगळ्या स्वरूपात का असेना, पण तो असावा. कारण सण आणि उत्सव साजरे करण्यामागचा उद्देशच तो आहे.
साठच्या दशकात साधारणपणे कुठल्याही कुटुंबात बहीणभावांचा एकंदर आकडा सहा-सातच्या पुढे असायचा. एक मुलगा, एक मुलगी अशी अपत्ये अपवादानेच एखाद्या कुटुंबात आढळायची. कुटुंबातील मुला-मुलींची संख्या जास्त असली तरी, प्रत्येक कुटुंबांची आर्थिक स्थिती चांगली असायचीच असे नाही. किंबहुना, उलटेच असायचे. तरीही भरपूर अपत्ये ही कुटुंबाची शान असायची. ही सगळी मुले स्वयंसिद्ध, स्वाभिमानी, रोखठोक असायची. संसर्ग, मानसिक ताण असले शब्द तेव्हा कुणाच्या गावीही नसायचे. प्रत्येक सण आनंदाने साजरा व्हायचा. अशा कुटुंबात दिवाळीची मौज न्यारीच. तिथे पैशाला तोटा असला तरी, आनंद वारेमाप असायचा. काटकसर नसनसात भिनली असल्याने थोडय़ातही गोडी मानणारी कुटुंबे होती तेव्हा.
त्या काळातील अशा घरातील भाऊ बीज म्हणजे जोपर्यंत घरातली मुलं-मुली शिकतायत, तोपर्यंत वडील प्रत्येक मुलाला भाऊबीज म्हणून घालण्यासाठी एखादा रुपया किवा कधीकधी नुसतीच सुपारीदेखील द्यायचे. भाऊबिजेच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्या झाल्या हातावर ही ‘दक्षिणा’ पडायची आणि त्यादिवशी दिवाळीचा फराळ झाला की लांबलचक सतरंजीची घडी किंवा पाट मांडून सगळ्या बहिणींची ओवाळणी पार पडत असे. बहिणीला किंवा भावाला ओवळणीत काय देतोय, याचे कौतुक वा वैषम्य नसायचे. समाधान आणि ओवाळणीतील रकमेचा आकडा यांचा दुरान्वये संबंध नसायचा.
बहिणींची लग्न झाली आणि मुलगे नोकरीला लागले की मात्र हे चित्र बदलायचे. अनेक बहिणी आणि अनेक भाऊ असले की, मग कोणता भाऊ कोणत्या बहिणीकडे जायचे, असे ठरवले जायचे. ज्या घरात एकच भाऊ आणि जास्त बहिणी असायच्या, त्या भाऊरायाची मात्र तारांबळ उडायची. भाऊबिजेच्या दिवसाचा कार्यक्रम ठरलेला असायचा. जाण्याची ठिकाणे तरी किती आणि कुठल्या कुठल्या दिशेला. त्यानुसार मार्ग ठरायचा. मग लोकलचे रिटर्न तिकीट काढायचे आणि त्या तिकिटावर सगळय़ा बहिणींच्या घरी हजेरी लावायची. जाताना प्रत्येक बहिणीसाठी आईने दिलेला किवा बायकोनी दिलेली घरगुती फराळाची पुडी, भाचे कंपनीसाठी लवंगी फटक्याचे आणि केपाची डब्बी आणि फुलबाज्याचे एक एक पाकीट.
सकाळी कडक इस्त्रीच्या नव्या कोऱ्या कपडय़ांत घराबाहेर पडलेला भाऊराया ही सगळी ठिकाणे उरकून घरी परतेपर्यंत लोकलमधील धक्क्यांनी त्याची अवस्था ‘चुरगळलेली’ होऊन जायची. पण चेहऱ्यावर त्रासिक भाव दिसायचा नाही. प्रवासाची दगदग नाही. घामाची परवा नाही. कपाळावरचे लाल गंध आणि असंख्य अक्षता अभिमानाने मिरवत, बहिणीने दिलेल्या फराळाची पुडी सोबत घेऊन रात्री अगदी सामाधानाने आणि आनंदाने भाऊरायाची स्वारी घरी परतायची.
सगळ्या बहिणींचे क्षेम कुशल आईवडिलांच्या कानावर घालायचे, भाऊबिजेच्या दुसऱ्या दिवशीचा तो एक अगत्याच कार्यक्रम म्हणून न विसरता पार पडायचा. फोन नव्हते, मोबाइल तर स्वप्नातदेखील नव्हते, तरीही दरवर्षी हे सर्व हमखास आणि आनंदाने पार पडायचे. कसे? ते मात्र माहीत नाही. तो एक काळाचा महिमा.
gadrekaka@gmail.com
(दिवाळीची तयारी)
भूतकाळातील दिवाळी आजही लख्ख आठवते. साठ-सत्तरच्या दशकात दिवाळीच्या महिनाभर आधीपासून बोनस, त्यासाठीची आंदोलने यांच्या बातम्या चर्चेत असायच्या. मग सरकारने दिवाळीनिमित्त शिधादुकानांत जादा दिलेली साखर, रवा, तेल, तूप यांचे अप्रूप असायचे. कार्डवर मिळणारे आरेचे अधिक दूध ही एक पर्वणीच असायची.
दिवाळसणाच्या महिनाभर आधी ही लगबग सुरू असायची, तर दिवाळी तोंडावर येताच आकाशकंदील बनवण्याची घाई सुरू व्हायची. रेडिमेड कंदील ही संकल्पनाच नव्हती तेव्हा. बांबू, खळ, रंगीबेरंगी कागद जमवून कंदील बांधणीला सुरुवात व्हायची. आदल्या वर्षी जपून ठेवलेली रांगोळी, गेरू, रंग, उदबत्तीने भोकं पाडून तयार केलेला ठिपक्यांचा कागद, मातीच्या पणत्या हे सगळं बाहेर निघायचं.
आकाशकंदिलात बल्ब लावण्यासाठी कायम तयार करून ठेवलेली वायर आणि दरवर्षी हमखास दुरुस्त करून लावावी लागणारी इलेक्ट्रिक दिव्याची माळ काढून चेक करून ठेवणे, दिवाळीत आणि फक्त दिवाळीतच नवीन शिवायला दिलेले कपडे तयार झालेले आहेत का हे पाहण्यासाठी शिंप्याकडे माराव्या लागणाऱ्या चकरा या गोष्टी सणाचा जणू अविभाज्य भाग. प्रत्येक ऑफिसमध्ये दिवाळीत फटाके विकण्याचा व्यवसाय करणारा एक तरी महाभाग असायचाच, त्याच्याकडून घेतलेले आणि भावंडांत भांडणे होऊ नयेत म्हणून वडिलांनी आधीच वाटून दिलेले फटाके आणि ते खात्रीने वाजावेत म्हणून रोज उन्हात वाळवत ठेवण्याची मुलांची धडपड हे सगळं दिवाळीचं अंगच होतं.
दर महिन्याच्या वाणसामानाच्या यादीत या महिन्यात वासिक साबण, अत्तर बाटली आणि सुवासिक केशतेल यांची भर पडायची, ज्यांच्याकडे मुलीचा दिवाळसण साजरा होत असेल त्या कुटुंबात त्या वर्षीच्या दिवाळीत जावईबापूंची आणि त्याच्या सासरच्या मंडळींचे ऊठबस करण्यासाठी काय काय दिव्य करावी लागतील त्यासाठी नियोजन आधी सहा महिन्यांपासून करावे लागे.
अजून एका गोष्टीने दिवाळी आता आठ-दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे हे समजायचे ते म्हणजे प्रत्येक घरात तयार करण्यात येणाऱ्या दिवाळीच्या फराळाचा सर्व वस्तीभर रोज पसरणारा खमंग दरवळ. त्या काळात कुटुंबातील स्त्रिया हळूहळू नोकरीसाठी बाहेर पडू लागल्या होत्या, म्हणून तयार फराळाचे जिन्नस काही प्रमाणत आणि काही ठिकाणी मिळू लागले होते, परंतु आजच्यासारखे ते वर्षभर आणि सर्रास आणि सर्वत्र उपलब्ध नव्हते. म्हणून त्याची अपूर्वाईदेखील होती. प्रत्येक कुटुंबात घरी काम करणाऱ्या स्त्रियांची अजिबात कमतरता नसल्यामुळे आणि शेजारीपाजारी लोकांचे हमखास सहकार्य असल्यामुळे शिवाय नोकरी करणाऱ्या असल्या तरी काटकसर, आवड आणि अनुकूल अशा नोकरीच्या वेळा यामुळे फराळ घरी करणे सहज शक्य होत असे. आपल्या घरात दिवाळीचा सण आनंदात साजरा होत असताना ज्या कुटुंबाने आपल्या कुटुंबातील व्यक्ती वर्षभराच्या काळात गमावली आहे अशा कुटुंबाची आठवणदेखील आवर्जून घेतली जायची आणि त्यासाठी घरातील करती स्त्री त्या कुटुंबाकरितादेखील फराळाचे जिन्नस न विसरता तयार करायची. दिवाळीच्या आधी चार-पाच दिवस घरातील कर्ता पुरुष किंवा मुलगा ते फराळाचे डबे घेऊन त्या घरी नेऊन द्यायचा, एक सामाजिक कर्तव्य म्हणून जबाबदारीने पार पाडायचा. त्या तशा सर्व तऱ्हेच्या टंचाईच्या काळात आणि तुटपुंज्या मिळकतीत आपल्या कुटुंबाचा सण साजरा करण्यासाठी कितीतरी यातायात त्या कुटुंबप्रमुखाला आणि त्या कुटुंबातील कर्त्यां स्त्रीला करावी लागे, पण आपल्याबरोबर जे कुटुंब दु:खी आहे त्या कुटुंबाचीदेखील सणावारी आठवणीने काळजी घेणारी कुटुंबे होती याची कल्पना एकमेकांना व्हॉट्सअॅपवरून भारंभार शुभेच्छा, पुष्पगुच्छ आणि रंगीबेरंगी केकचे फोटो पाठविणाऱ्यांना कदाचित येणार नाही.