डोंबिवलीतील एका सेवानिवृत्त प्राध्यापिकेची पुण्यातील एका एजंट महिलेने अधिक गुंतवणूक अधिक परतावा या बोलीतून २० लाख २४ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. अधिक परतावा, नवीन पॉलिसी नाहीच पण मूळ रक्कमही एजंटकडून परत मिळत नसल्याने प्राध्यापिकेन रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रा. उज्जवला भालचंद्र करंडे (६९, रा. अलंकार सोसायटी, टिळक रोड, सर्वेश सभागृहासमोर, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार महिलेचे नाव. प्रा. करंडे ३८ वर्ष डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात मानसशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या. लेखिका, सुसंवादक, निवेदिका म्हणून त्यांची ओळख आहे. सुप्रिया नामदेव भुजबळ (रा. पुणे नगर रोड, तळेगाव ढमढेरे, २४ वा मैल, भारत पेट्रोल पंप, पुणे) असे आरोपी महिलेचे नाव आहे. एजंट सुप्रिया भुजबळ यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन प्रा. करंडे यांनी गेल्या सहा वर्षापासून पॅन क्लब या खासगी गुंतवणूक योजनेत गुंतवणूक केली होती. पॅन क्लबमध्ये केलेल्या अगोदरच्या गुंतवणुकीतून अधिकचा परतावा मिळावा. तसेच आणखी गुंतवणूक केली तर अधिक परतावा देणाऱ्या पॉलिसी काढते असे सांगून सुप्रिया यांनी प्रा. उज्जवला करंडे यांच्याकडून धनादेश, रोख रकमेच्या माध्यमातून पैसे उकळले, असे पोलिसांनी सांगितले.

सहा वर्षाच्या कालावधीत आकर्षक परतावा नाहीच, पण नवीन पॉलिसी एजंट सुप्रिया भुजबळ यांनी काढल्या नाहीत. यासंदर्भात प्रा. करंडे सुप्रिया यांना गुंतवणुकीसंदर्भात विचारणा करत होत्या. त्या खोटी माहिती प्रा. करंडे यांना देत होत्या. वारंवार विचारणा करून सुप्रिया आपणास योग्य माहिती देत नाहीत. आपल्या संपर्काला योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे सुप्रिया यांनी आपल्याकडून पैसे घेऊन आकर्षक परतावा न देता आपली फसवणूक केली आहे. अशी प्रा. करंडे यांची खात्री झाली.

डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात प्रा. करंडे यांनी सुप्रिया भुजबळ यांच्या विरुध्द पैशाचा अपहार आणि फसवणुकीची तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.